Join us

अनिता राजने लॉकडाऊनमध्ये घरी केली पार्टी? पोलिस पोहोचले चौकशीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:10 IST

अनिता राजने तिच्या घरी पार्टी आयोजित केली असल्याची माहिती ती राहात असलेल्या बिल्डिंगच्या सिक्युरीटी गार्डने पोलिसांना दिली होती.

ठळक मुद्देअनिता राज आणि तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, सिक्युरीटी गार्डने चुकीची माहिती पसरवली असून अशाप्रकारे कोणतीही पार्टी घरात आयोजित करण्यात आलेली  नाहीये.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याविषयी लोकांना वारंवार सुचना केल्या जात आहेत. काही सोसायटींमध्ये तर बाहेरच्या लोकांना परवानगी देखील दिली जात नाहीये. पण या सगळ्यात अभिनेत्री अनिता राजने तिच्या घरी पार्टी आयोजित केली असल्याची माहिती ती राहात असलेल्या बिल्डिंगच्या सिक्युरीटी गार्डने पोलिसांना दिली होती.

अनिता राजच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली असून तिचे जवळचे मित्रमैत्रीण यात सहभागी होणार असल्याची माहिती बिल्डिंगच्या सिक्युरीटी गार्डने पोलिसांना दिली असल्यामुळे ते चौकशीसाठी अनिताच्या घरी पोहोचले. पण घरी गेल्यानंतर परिस्थिती काही वेगळीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अनिता राज आणि तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, सिक्युरीटी गार्डने चुकीची माहिती पसरवली असून अशाप्रकारे कोणतीही पार्टी घरात आयोजित करण्यात आलेली  नाहीये. 

अनिता राजने पुणे मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझे पती हे डॉक्टर असून त्यांचा एक मित्र पत्नीला घेऊन आमच्या घरी आला होता. तब्येत बरी नसल्याने ते तपासणीसाठी आमच्याकडे आले होते. माझे पती हे डॉक्टर असल्याने रुग्णांना पाहाणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि त्यामुळे ते नकार देऊ शकले नाहीत. या सर्व प्रकरणाविषयी चुकीची माहिती पोलिसांना देण्यात आली. आम्ही कोणत्याही प्रकारे लॉकडाऊनचे उल्लंघन केलेले नाहीये. पोलिसांनी घरी येऊन आमची चौकशी केली असून घडल्या प्रकाराबाबत आमची माफी देखील मागितली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या