Join us
Daily Top 2Weekly Top 5

Border 2: 'घर कब आओगे' गाण्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवर स्पष्टच बोलला वरुण धवन, म्हणाला- "सगळे जण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:55 IST

'बॉर्डर २' सिनेमातील घर कब आओगे हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पण, या गाण्यात वरुण धवनच्या अभिनयामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता अभिनेत्याने त्याची बाजू मांडत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 

'बॉर्डर २' या सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमात वरुण धवन, सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'बॉर्डर २' सिनेमातील घर कब आओगे हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'बॉर्डर'मधील संदेसे आते है या गाण्याचा हा रिमेक आहे. पण, या गाण्यात वरुण धवनच्या अभिनयामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता अभिनेत्याने त्याची बाजू मांडत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 

वरुण धवन 'बॉर्डर २'मध्ये मेजर होशियार सिंग दहिया ही सैनिकाची भूमिका साकारणार आहे. नुकतंच त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने "मेजर होशियार सिंग दहिया यांना दिलेल्या प्रेमासाठी थँक्यू" असं कॅप्शन दिलं आहे. वरुण धवनच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने घर कब आओगे या गाण्यावरुन झालेल्या ट्रोलिंगवर वरुण धवनला विचारलं आहे. "भाई तुझ्या अभिनयावर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांना काय सांगशील", अशी कमेंट चाहत्याने केली आहे. चाहत्याच्या या कमेंटवर वरुण धवनने उत्तर दिलं आहे. 

"याच प्रश्नाने गाणं हिट केलं आहे. सगळे जण गाणं एन्जॉय करत आहेत...देवाची कृपा", असं उत्तर देत वरुण धवनने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे. संदेसे आते है प्रमाणेच 'घर कब आओगे' या गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या संदेसे आते है गाण्याचं नवं व्हर्जन 'घर कब आओगे' हे गाणं मनोज मुंतशिर यांनी लिहिलं आहे. या गाण्याला सोनू निगम, अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल मिश्रा यांनी आवाज दिला आहे. हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. 

'बॉर्डर २' सिनेमा हा येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर म्हणजेच २३ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात  सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, वरुण धवन, मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा अशी स्टारकास्ट आहे. अनुराग सिंग यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Varun Dhawan Addresses Trolling Over 'Border 2' Song 'Ghar Kab Aoge'

Web Summary : Varun Dhawan responded to trolls criticizing his performance in 'Border 2's' 'Ghar Kab Aoge' song. He stated people are enjoying the song. The film releases January 23, starring Sunny Deol and others.
टॅग्स :सीमारेषावरूण धवन