जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडमध्ये आहे. भारताने पाकिस्तानची अनेक बाजूंनी कोंडी केल्यामुळे तणावाचं वातावरण आहे. अशातच पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि भारताचं नागरिकत्व मिळवलेल्या अदनान सामीने पाकिस्तानी लष्कर आणि नागरिकांबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने पाकिस्तानी आर्मीबद्दल तिथल्या तरुणांच्या मनात द्वेष असल्याचं म्हटलं आहे.
"मी अझरबैजानमधील बाकू येथील सुंदर रस्त्यांवर चालत असताना काही पाकिस्तानी तरुण भेटले. ते मला म्हणाले की "सर, तुम्ही खूपच भाग्यवान आहात. तुम्ही योग्य वेळी पाकिस्तान सोडलं. आम्हालादेखील आमचं नागरिकत्व बदलायचं आहे. आम्ही आर्मीचा तिरस्कार करतो. त्यांनी आमचा देश उद्ध्वस्त केला. यावर मी त्यांना म्हणालो की हे मला आधीपासूनच माहीत आहे", असं अदनान सामीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अदनान सामीकडे पाकिस्तानचं नागरिकत्व होतं. त्याचा जन्म लंडनमध्ये झाला होता. त्याचे वडील अरशद सामी हे पाकिस्तानी वायुसेनेत पायलट होते. २००१ मध्ये अदनान सामी भारतात आला. बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केल्यानंतर २०१६मध्ये त्याने भारताचं नागरिकत्व घेतलं.