Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू म्हातारी झालीस, आता काय काम करणार?", पन्नाशी पार मनीषा कोईरालाला बॉलिवूडमधून मिळत आहेत टोमणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:12 IST

पन्नाशी पार केलेल्या मनिषाला वयामुळे मात्र काम मिळत नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. 

मनीषा कोईराला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्याने तिने एक काळ गाजवला. ९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी मनिषा कोईराला एक होती. पण, आता मात्र मनिषाला बॉलिवूडमधून टोमणे ऐकायला मिळत आहे. पन्नाशी पार केलेल्या मनिषाला वयामुळे मात्र काम मिळवण्यास अडचण येत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे. 

५४ वर्षीय मनीषा कोईरालाने संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेब सीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. पण, वयामुळे काम मिळत नसल्याचा खुलासा तिने  'फ्री प्रेस जनरल'ला दिलेल्या मुलाखतीत दिला. या मुलाखतीत ती म्हणाली, "आपण पन्नाशीनंतरही काम करून धमाल करू शकतो हे दाखवून दिलं आहे. आपण अजूनही कमाल आयुष्य जगू शकतो. अजूनही चांगलं काम करू शकतो. आताही आपण आनंदी आणि हेल्दी आयुष्य जगू शकतो. जिवंत असेपर्यंत मला काम करायचं आहे. मला सुंदर दिसायचं आहे. हाच माझा उद्देश आहे".

"मी म्हातारी झाली असं अनेकांना वाटतं. ही आता काय काम करू शकते. काही लोक विचार करतात की हिला आई किंवा बहिणीची भूमिका देऊया. पण, महिला कलाकार दमदार भूमिका साकारू शकतात. माझ्या आधीही अनेक अभिनेत्रींनी असं केलं आहे. आणि मलादेखील हे करायचं आहे. माझ्यातही जिद्द आहे. एक कलाकार म्हणून मला पुढे जायचं आहे. वय हा केवळ एक आकडा आहे. जो मला थांबवू शकत नाही. वयामुळे कोणीही थांबू नये", असंही पुढे ती म्हणाली. 

वयामुळे राऊंडटेबल कॉन्फरन्समधून काढून टाकल्याचा खुलासाही मनिषा कोईरालाने केला. "फिल्म इंडस्ट्री असो वा आणखी कोणती इंडस्ट्री...वय वाढणं ही महिलासांठी एक समस्या आहे. आमचा अपमान केला जातो. मी कधीच कोणत्या पुरुषाला तू म्हातारा झाला, हे बोलताना ऐकलेलं नाही. पण, महिलांना नेहमीच ट्रोल केलं जातं. २-३ राऊंडटेबल कॉन्फरन्समधून मला वयाचं कारण देत बाहेरचा रस्ता दाखवला होता", असंही तिने सांगितलं.  

टॅग्स :मनिषा कोईरालासेलिब्रिटी