Join us

लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र...! जनजागृती करणारा सोनू सूद विनाहेल्मेट बाइक चालवताना दिसल्याने आला अडचणीत, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:13 IST

सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात विनाहेल्मेट बाइक चालवताना दिसल्याने अभिनेता चांगलाच अडचणीत आला आहे

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) त्याचे सिनेमे आणि सामाजिक कार्यांमुळे चर्चेत असतो. परंतु एका व्हायरल व्हिडीओमुळे सोनू सूद अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या व्हिडीओत अभिनेता हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅलीमध्ये विनाहेल्मेट आणि सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता बाइक चालवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसतं की, अभिनेता शर्टलेस, केवळ चष्मा घालून, बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये बाइक चालवत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोनू सूद अडचणीत सापडला आहे.

सोनू सूद अडचणीत

सोनू सूदचा हा व्हिडिओ 'Ride With Victor' या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. सोनू सूदने अलीकडेच रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली होती. पण स्वतः मात्र विनाहेल्मेट फिरताना दिसला. 

या घटनेनंतर लाहौल-स्पीती पोलिसांनी X वरून एक निवेदन जारी करून सांगितले की, "सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेता लाहौल-स्पीती जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२३ चा आहे. या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी डीएसपी मुख्यालय, किलॉंग यांना जबाबदारी देण्यात आली आहे."

सोनू सूदने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेनंतर सेलिब्रिटींनी सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे पालन करणे किती आवश्यक आहे, याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सोनू सूदवर पोलीस आता कायदेशीर कारवाई करुन त्याच्यावर दंड आकारणार का, हे  पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

टॅग्स :सोनू सूदरस्ते सुरक्षा