Naseeruddin Shah Post: अभिनेता दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) 'सरदारजी ३' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटात तो पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत एकत्र काम करत असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर दिलजीतला अनेक ठिकाणी विरोध होऊ लागला आणि भारतात चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आलं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यात आता सरदारजी-३ मध्ये हानिया आमिरची कास्टिंग पाहून दिलजीतला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अशातच ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसीरुद्धीन शाह (Naseeruddin Shah) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नसीरुद्धीनशाह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या पोस्टमध्ये दिलजीत दोसांझला पाठिंबा दर्शवत त्यांनी लिहिलंय की, "माझा दिलजीतला पूर्णपणे पाठिंबा आहे. काही लोक त्याच्यावर चुकीचे आरोप करत आहेत. चित्रपटातील कास्टिंगचा निर्णय हा दिग्दर्शकाचा होता, दिलजीतचा नाही. तो एक चांगला कलाकार आहे आणि त्याने कोणतीही गोष्ट मनात न ठेवता चित्रपटात काम केलं. काही लोक भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत."
त्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलंय, "माझे जवळचे नातेवाईक आणि मित्र पाकिस्तानात आहेत. त्यांना प्रेम करण्यापासून किंवा भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही." अशा आशयाची पोस्ट शेअर करत त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
'सरदार जी ३' बद्दल दिलजीत दोसांझ स्पष्टीकर देत म्हटलं होतं की, या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्येच झालं होतं, तेव्हा देशातील वातावरण पूर्णपणे ठीक होतं. यासोबतच, हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांचा नाही तर निर्मात्यांचा होता. 'सरदारजी ३' हा चित्रपट २७ जून रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने पाकिस्तानात विक्रमी कमाई केली आहे.