Join us  

'पठाणांच्या घरात ब्राह्मण जन्माला आलाय'; 'या' एका गोष्टीमुळे इरफानचे वडील करायचे त्याची मस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 1:30 PM

Irrfan khan: इरफानची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या बालपणीचे काही किस्से सांगितले होते.

लोकांच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी रंगरुपाची गरज नाही तर टॅलेंट महत्त्वाचं आहे हे अभिनेता इरफान खान  (Irrfan Khan) याने सगळ्यांना पटवून दिलं. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही इरफानने त्याच्या अभिनयाचा डंका वाजवला. आज हा अभिनेता आपल्यात नाही. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. त्यामुळेच वरचेवर त्याचे किस्से चाहत्यांमध्ये रंगतात. यात सध्या सोशल मीडियावर त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या प्राणीप्रेमाविषयी भाष्य केलं होतं.  इतकंच नाही तर त्याच्या या प्रेमापोटी अनेक जण त्याची मस्करी करायचे हे सुद्धा त्याने सांगितलं.

पठाण कुटुंबात जन्माला आलेला इरफानचं प्राण्यांवर विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्याचे वडील त्याला कायम मस्करीत 'पठाणांच्या घरात ब्राह्मण जन्माला आलाय', असं म्हणायचे. हे आवर्जुन त्याने या मुलाखतीत सांगितलं.

"माझे वडील शिकारी होते. त्यामुळे ते वरचेवर जंगलात जाऊन शिकार करायचे. त्यांच्यासोबत जंगलात जाणं आम्हाला आवडायचं पण एखाद्या प्राण्याला मारताना तितक्याच वेदना व्हायच्या. एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर मी कायम विचार करायचो, की आता याच्या आईचं काय झालं असेल, त्याच्या मुलांचं काय होणार. एकदा माझ्या वडिलांनी मला बंदूक चालवायला सांगितली. माझ्या त्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीमुळे एक प्राणी मारलाही गेला. त्यावेळी मला प्रचंड वाईट वाटलं होतं. त्यावेळी वडिलांनी माझी खिल्ली उडवली होती. पठाणांच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आला? असं त्यांनी मस्करीत म्हटलं होतं", असं इरफानने सांगितलं.

दरम्यान, इरफान खानचं २९ एप्रिल २०२० मध्ये निधन झालं. गेल्या कित्येक वर्षांपासून तो दीर्घ आजाराशी लढा देत होता. मात्र, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :इरफान खानबॉलिवूडहॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा