Join us  

Birthday Special : अन् निर्मात्यांनी मागितली विद्या बालनची जन्मपत्रिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 6:00 AM

परिणीता , कहानी , डर्टी पिक्चर , कहानी2 यारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री विद्या बालन हिचा आज (१ जानेवारी)वाढदिवस.

ठळक मुद्देमुंबईच्या चेंबूर येथे एका तामिळ कुटुंबात विद्याचा जन्म झालाविद्याला चित्रपटात यायचे होते. पण हा मार्ग सोपा नव्हता२००७ मध्ये आलेल्या  भूल-भुलैय्या  या चित्रपटाने मात्र विद्याच्या करिअरला एक वेगळे वळण दिले

परिणीता , कहानी , डर्टी पिक्चर , कहानी2 यारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेली अभिनेत्री विद्या बालन हिचा आज (१ जानेवारी)वाढदिवस. विद्याला तिच्या चित्रपटाच्या यशासाठी कुठल्याही लोकप्रीय पुरूष कलाकाराची गरज नाही आणि ही गोष्ट तिने सिद्ध करून दाखवलीय. कामावरची निष्ठा आणि प्रतिभा असेल तर तुम्ही संपूर्ण चित्रपटात स्वबळावर उभा करू शकता, हे विद्याने तिच्या अनेक चित्रपटांमधून दाखवून दिलेय. विद्याबद्दल अशाच काही माहित नसलेल्या गोष्टी...

मुंबईच्या चेंबूर येथे एका तामिळ कुटुंबात विद्याचा जन्म झाला. तिच्या घरात मल्याळम आणि तामिळ अशा दोन्ही भाषा बोलल्या जातात. माधुरी दीक्षित आणि शबाना आझमी यांच्यापासून प्रेरित होऊन मी बॉलिवूडमध्ये जाणार, हे विद्याने अगदी लहानवयातच ठरवून टाकले होते. १६ वर्षांची असतानाच विद्याला एकता कपूरच्या ‘हम पांच’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

विद्याच्या आयुष्यात एक काळ तर असा होता की, निर्माते तिला  ‘पनवती’ समजायचे. कदाचित हे वाचून तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु हे खरे आहे. काही निर्मात्यांनी तर केवळ विद्या चित्रपटात काम करीत असल्याने ते चित्रपट रिलीज होऊ दिले नाहीत. कारकिर्दीच्या सुरुवातीला विद्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भाग्य आजमावायचे ठरवले. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलालसोबत ‘चक्रम’ या चित्रपटात तिला संधी मिळालीही. या चित्रपटानंतर तिने तब्बल १२ सिनेमे साईन केलेत. पण काही कारणास्तव ‘चक्रम’चे चित्रीकरण सतत पुढे ढकलले गेले. मोहनलालने साऊथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या करियरमध्ये कोणताच चित्रपट डिले झाला नव्हता. ‘चक्रम’ डिले झाला आणि त्याचे सगळे खापर विद्याच्या डोक्यावर फोडण्यात आले.   निर्मात्यांनी तर विद्याला कमनशिबी ठरवून टाकले. त्यानंतर या चित्रपटातून विद्याची हकालपट्टी झाली.  मोहनलालने देखील या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. निर्मात्यांनी दुसरे कलाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटानंतर विद्याच्या हातून तिने साईन केलेले १२ चित्रपटही गेलेत.  विद्याने त्याकाळी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. परंतु विद्या या चित्रपटात असल्यामुळे प्रेक्षक त्यास स्वीकारणार नाहीत, या भीतीपोटी  तिचे हे चित्रपट रिलीजच होऊ गेले नाहीत. त्यानंतर तर असा समज पुढे आला की, जो कोणी विद्यासोबत काम करणार त्याला नक्कीच तोटा सहन करावा लागणार. एका मुलाखतीदरम्यान विद्याने सांगितले होते की, इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावे लागले. सुरुवातीला मी अनेक चित्रपटांसाठी आॅडिशन दिले; मात्र प्रत्येक ठिकाणी मला नकाराचा सामना करावा लागला. अशात मी खचून गेली नाही, मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले.  परिणिता  हा चित्रपट मिळाला तेव्हा मला याकरिता कित्येकदा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. एवढेच नव्हे तर  निर्मात्यांनी चक्क माझी जन्मपत्रिकाही मागितली होती, असे विद्याने सांगितले होते.  

विद्याला चित्रपटात यायचे होते. पण हा मार्ग सोपा नव्हता. मल्याळम आणि तामिळ चित्रपटसृष्टीतही विद्याने बरेच प्रयत्न केलेत. पण ती अपयशी ठरली. बंगाली चित्रपट ‘भालो थेको’पासून विद्याला खरी ओळख मिळाली. यानंतर विद्याला  परिणीता  चित्रपट मिळाला आणि विद्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटासाठी विद्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर  लगे रहो मुन्नाभाई,  गुरू, सलाम ए इश्क  यासारख्या अनेक चित्रपटात विद्या दिसली. पण तिला फारसी प्रसिद्धी मिळू शकली नाही.

२००७ मध्ये आलेल्या  भूल-भुलैय्या  या चित्रपटाने मात्र विद्याच्या करिअरला एक वेगळे वळण दिले. यानंतर २००९ मध्ये आलेला  पा आणि विशाल भारद्वाज यांचा  इश्किया या चित्रपटांसाठी विद्याने सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. यानंतर आलेल्या  डर्टी पिक्चर ने मात्र विद्याला आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नेऊन बसवले. या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. यानंतर विद्या  कहानी  या चित्रपटात दिसली. यातील तिने साकारलेली दुर्गा रानी सिंह हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावली.  

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूड