Join us

Birthday special : रितेश हिंदीबरोबरच मराठीतही ‘लय भारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 15:46 IST

घरात राजकारणाचा वारसा, वडील मुख्यमंत्री पण त्याला अभियानाची आवड. त्यामुळे राजकारणाकडे न वळता त्याने आपली गाडी अभिनयाकडे वळवली आणि ...

घरात राजकारणाचा वारसा, वडील मुख्यमंत्री पण त्याला अभियानाची आवड. त्यामुळे राजकारणाकडे न वळता त्याने आपली गाडी अभिनयाकडे वळवली आणि तो आज यशाच्या शिखरावर आहे. तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका असलेला हिंदीततला आघाडीचा अभिनेता अर्थातच रितेश देशमुख...   २००३ मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून त्याने यावर्षीच्या ‘बेंजो’पर्यंत अनेक सुपरिहट चित्रपट दिलेत. ‘क्या कूल है हम’,  ‘हे बेबी’, ‘धमाल’,  ‘हाउसलफुल’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’ आणि ‘मस्ती’ यासारख्या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.रितेशचा जन्म १७ डिसेंबर १९७८ ला लातूरमध्ये विलासराव देशमुख आणि वैशाली देशमुख यांच्यापोटी झाला. मुंबईतील कमला रहेजा कॉलेज आॅफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टचे रितेशने शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात जाऊन एका आर्किटेक्ट फर्ममध्ये एक वर्षे प्रॅक्टीसही केली. अभिनय, स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस यात बिझी असलेला रितेश आर्किटेक्चरल अँड इंटीरियर डिझाइनिंग फर्म  इवोल्यूशन्स देखील चालवतो.रितेश गेली १३ वर्षे चंदेरी दुनियेत आपल्या उमदा अभिनयाची छाप सोडतोय. ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती, हाउसफुल-२,  हाउसफुल-३,  बॅँगिस्तान, क्या सुपर कूल हैं हम,  डबल धमाल, जाने कहा से आयी है, अलादीन, अपना सपना मनी मनी आणि एक विलेन यासारख्या अनेक चित्रपटांचा यात उल्लेख करता येईल. २००३ साली जेनेलियासोबत त्याचा पदार्पणाचा चित्रपट तुझे मेरी कसमने रितेशला ओळख मिळवून दिली. याच चित्रपटापासून जेनेलिया व रितेशची लव्ह स्टोरी  सुरु  झाली. त्यानंतर २००४ मध्ये आलेल्या मस्ती या विनोदी चित्रपटाने आणि बर्दाश्त या चित्रपटाने त्याच्या लोकप्रियतेत भर टाकली. मस्ती चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याने फिल्म फेअर पुरस्कारही मिळवला.रितेशने २०१३ मध्ये आपल्या स्वत:च्या  मुंबई फिल्म कंपनी  या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना करत  बालक-पालक  या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर लय भारी या चित्रपटातून रितेशने मराठी सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकले. त्याने सेलिब्रिटी क्रि केट लीगमध्ये ‘वीर मराठी’ क्रि केट टीम लाँच केली आहे. यात त्याचा भाऊ धीरज देशमुख पार्टनर आहे आणि याची ब्रँड अम्बॅसेडर जेनेलिया देशमुख आहे.२ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश व जेनेलिया विवाहबंधनात अडकले. त्याला २ अपत्य आहेत. सध्याला बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीत तो गुंतला आहे.