Join us  

Birth Anniversary:  ‘या’ अभिनेत्रीने 87 वर्षांपूर्वी दिला होता तब्बल 4 मिनिटांचा किसींग सीन, उडाली होती खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 8:06 AM

भारतीय सिनेसृष्टीची पहिली अभिनेत्री देविका रानी यांची आज जयंती...

ठळक मुद्दे1945 मध्ये देविका रानी यांनी रशियाचे पेंटर स्वेतोस्लाव रोएरिच यांच्याशी दुसरा विवाह केला.

बोल्ड सीन आणि किसिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. मात्र चित्रपटसृष्टीचा सुरुवातीचा काळ असा नव्हता. ज्या काळात महिलांना बाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती, त्या काळात किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्सची कुणीही कल्पना करू शकत नव्हते. मात्र याच काळात देविका राणी नावाची एक अभिनेत्री चित्रपटात अभिनय करून अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनली होती. आज देविका राणी यांचा वाढदिवस. होय, 1908 साली आजच्याच दिवशी म्हणजे 30 मार्चला देविका राणी यांचा जन्म झाला होता. 9 मार्च 1994 साली देविका राणींनी जगाचा निरोप घेतला. 

देविका राणी यांनी आपले संपूर्ण शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले. शिकत असतानाच त्यांना अभिनय आवडू लागला आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्थात देविका राणींचे कुटुंब या निर्णयाच्या विरोधात होते.

देविका यांनी इंग्लड येथे रॉयल अकादमी ऑफ  ड्रामेटिक आर्टमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. यानंतर त्यांनी वास्तूकलेतही डिप्लोमा घेतला. बुस्र बुल्फ नामक निर्माते देविकांच्या वास्तूकलेवर असे काही भाळले की, त्यांनी देविकांना आपल्या कंपनीत डिझाईनर म्हणून नियुक्त केले. याचदरम्यान देविकांची भेट सुप्रसिद्ध निर्माते हिमांशू राय यांच्याशी झाली. देविकाचे सौंदर्य पाहून हिमांशू राय जणू मंत्रमुग्ध झालेत. त्यांनी देविकांना आपल्या ‘कर्म’ या सिनेमात काम करण्याचा प्रस्ताव दिला. देविकांनी लगेच हा प्रस्ताव स्वीकारला.

4 मिनिटांचा किसींग सीन

1933 प्रदर्शित झालेल्या ‘कर्म’ या सिनेमात हिमांशू राय मुख्य भूमिकेत होते. तर देविका राणी त्यांची हिरोईन. या चित्रपटात देविका यांनी हिमांशूसोबत जवळजवळ 4 मिनिटांचा किसींग सीन दिला होता. या किसींग सीनने देशात एकच खळबळ उडाली होती. यामुळे देविकांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. या चित्रपटावरही बंदी लादली गेली.

हिमांशु राय यांच्यासोबत थाटला संसार...

1929 मध्ये देविका रानी यांनी हिमांशु राय यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर दोघे जर्मनीमध्ये स्थायिक झाले. देविका व  हिमांशु यांनी बॉम्बे टॉकीज नावाचा एक स्टुडिओ स्थापित केले आणि या स्टुडिओच्या बॅनरखाली अनेक सुपरहिट सिनेमे दिले. यामध्ये काही सिनेमांमध्ये देविका यांनी अभिनेत्री म्हणून काम केले. 

 सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय 

 1940मध्ये हिमांशु राय यांचे निधन झाले. देविका यांनी स्टुडिओचे जबाबदारी स्वत:च्या हातात घेतली. त्यांनी अशोक कुमार आणि शशधर मुखर्जी यांच्यासोबत पार्टनरशिप करून सिनेमे निर्मित केले. मात्र त्यांचे सिनेमे अपयशी ठरले आणि देविका यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.  1943मध्ये रिलीज झालेला ‘हमारी बात’ त्यांना अभिनेत्री म्हणून शेवटचा सिनेमा होता. 10 वर्षांच्या करिअरमध्ये देविका यांनी जवानी की हवा , ममता और मिया बीवी  , जीवन नैया , सावित्री, वचन  आणि अनजान  सारखे सिनेमे केलेत.

 दुसरे लग्न 

हिमांशु राय यांच्या निधनाच्या पाच वर्षांनी म्हणजे 1945 मध्ये देविका रानी यांनी रशियाचे पेंटर स्वेतोस्लाव रोएरिच यांच्याशी दुसरा विवाह केला. लग्नानंतर दोघे मनाली, हिमाचल प्रदेशात गेले होते. तेथेच त्यांची भेट जवाहरलाल नेहरु आणि त्यांच्या कुटुंबीयांशी झाली. नेहरु देविका यांचे मोठे चाहते होते, असे सांगितले जाते. मनालीमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर देविका आणि त्यांचे पती स्वेतोस्लाव बंगळुरुमध्ये शिफ्ट झाले. तिथे त्यांनी स्वत:ची एक्सपोर्ट कंपनी सुरु केली. 9 मार्च 1994 रोजी भारतीय सिनेमाच्या या पहिल्या अभिनेत्री जगाचा निरोप घेतला.  

टॅग्स :बॉलिवूड