अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी व्यवसायातून दरवर्षी कोटींची कमाई करतात. अभिनयाव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी स्वत:चे बिजनेस सुरू केले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री तर चक्क हिमालयातील पाणी बॉटलमधून विकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भूमी पेडणेकर आहे. भूमीने नुकतंच व्यवसायात पदार्पण केलं आहे. बहिणीसोबत भूमीने व्यवसायात पाऊल ठेवलं आहे.
भूमीने बहीण समीक्षा पेडणेकरसोबत Backbay(बॅकबे) हा ब्रँड लाँच केला आहे. या कंपनीचं पहिलं प्रोडक्ट Backbay Aqua-नॅच्युरल मिनरल वॉटर असणार आहे. हिमालयातील पाणी Backbay Aqua द्वारे भूमी ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. या पाण्यातून नैसर्गिकरित्या मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे मिनरल्स ग्राहकांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी प्लास्टिक किंवा काचेची बाटली नव्हे तर पेपर पॅकेजिंग पासून बनवलेली बाटली वापरण्यात येणार आहे. या बाटलीचं झाकणंही पर्यावरणपूरक आहे.
हिमाचल प्रदेशातच भूमीच्या Backbay Aquaची कंपनी आहे. दररोज जवळपास ४५ हजार पाण्याच्या बाटल्याची निर्मिती होते. Backbay Aqua च्या एका पाण्याच्या बाटलीची किंमत ही चक्रावणारी आहे. Backbay Aqua च्या ५०० मिली पाण्याच्या बाटलीसाठी १५० रुपये आणि ७५० मिलीसाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. मिनरल वॉटरच नाही तर स्पार्कलिंग वॉटरही Backbay Aqua बाजारात आणणार आहे.
भूमीच्या या नव्या इनिंगसाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. भूमीने 'दम लगा के हइशा' या सिनेमातून २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये भूमी दिसली होती.