Bhool Chuk Maaf: हिंदी चित्रपटसृष्टीतून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मॅडॉक फिल्म्स आणि पीव्हीआर आयनॉक्स यांच्यात 'भूल चुक माफ' या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू झालेला वाद अखेर संपला आहे. मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाचा थेट ओटीटीवर (प्राइम व्हिडिओ) प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पीव्हीआर आयनॉक्सने याला विरोध केला होता आणि ६० कोटींच्या नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
या वादात न्यायालयाने सुरुवातीला चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला तात्पुरती स्थगिती दिली होती. आता सूत्रांनुसार, पीव्हीआर आयनॉक्सने नुकसानभरपाईची मागणी मागे घेतली असून, मॅडॉक फिल्म्सने चित्रपट २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन आठवड्यांनंतर, म्हणजेच ६ जून रोजी चित्रपट प्राइम व्हिडिओवर ओटीटी रिलीज होणार आहे.
‘भूल चुक माफ’मध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, मॅडॉकने अचानक ८ मे रोजी ओटीटी प्रदर्शनाची घोषणा केली होती, ज्यामुळे वितरक कंपनी पीव्हीआर आयनॉक्स नाराज झालं होतं. आता चित्रपटाच्या नवीन प्रमोशनला सुरुवात होणार आहे. अद्याप दोन्ही कंपन्यांकडून अधिकृत विधान आलेले नाही. मात्र. हा वाद मिटल्याने प्रेक्षकांना आता हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे. वाराणसीतील पार्श्वभूमी असलेली एक अनोखी प्रेमकथा आणि टाइम लूपचा अनोखा कॉन्सेप्ट असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.