Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत माता की जय... भारतमातेनेच ब्रिटनला व्हाईसराय म्हणून नवीन पंतप्रधान दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 15:19 IST

ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते जावईही भारताचेच आहेत.

भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केल्यामुळे भारतीयांना ब्रिटीश राजवटीची नेहमीच आठवण येते. मात्र, काळाने असे चक्र फिरविले की भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा देश आता एक भारतीय व्यक्ती चालविणार आहे. भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्या नावाची घोषणा झाली असून ते ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहेत. दिवाळीदिवशीच ही मोठी घडामोड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशभरातील नागरिकांसह अनेक दिग्गजांनाही या निवडीचा अभिमान वाटत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही खास शैलीत ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले. 

ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते जावईही भारताचेच आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत सुनक यांचे लग्न झाले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. या दोघांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत. त्यामुळे, ते भारतीय वंशाचे असून भारताचे जावईही आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी हा संयोगच म्हणावा लागेल. त्यामुळे, भारतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही खास ट्विट करुन ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे. 

अमिताभ यांनी भारत माता की जय... असे म्हणत ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले. तसेच, ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतमातेनंच नवीन व्हाईसराय दिला, असे म्हणत अमिताभ यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली. बिग बींचे हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. 

दरम्यान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यांना कंझर्वेटिव्ह पार्टीच्या सुमारे १८० खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या पेनी मोरडाँट यांना केवळ २६ खासदारांचा पाठिंबा मिळाला. पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने पेनी यांनी आपली दावेदारी मागे घेतली होती.

नारायण मूर्तींची प्रतिक्रिया

'आम्हाला त्यांचा अभिमान आहे, ते यशस्वी होतील या शुभेच्छा देतो. युनायटेड किंगडममधील लोकांसाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल असा आम्हाला विश्वास आहे.'' पीटीआयला मूर्ती यांनी मेल करून ही प्रतिक्रिया दिली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे असे नेते आहेत, ज्यांना सासर श्रीमंत असल्यामुळेही लक्ष्य केले जाते. 

टॅग्स :अमिताभ बच्चनऋषी सुनकलंडनपंतप्रधानभारत