आशुतोष गोवारीकरची धक्कादायक घोषणा; तिन्ही खानना एकत्र घेऊन बनविणार चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 21:02 IST
बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे आशुतोष गोवारीकर हे होय. ‘लगान, जोधा अकबर, मोहनजोदारो’ यांसारखे चित्रपट बनविणारे आशुतोष सध्या ...
आशुतोष गोवारीकरची धक्कादायक घोषणा; तिन्ही खानना एकत्र घेऊन बनविणार चित्रपट
बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे आशुतोष गोवारीकर हे होय. ‘लगान, जोधा अकबर, मोहनजोदारो’ यांसारखे चित्रपट बनविणारे आशुतोष सध्या अशक्य ती गोष्ट शक्य करण्यासाठी धडपड करीत आहेत. होय, आशुतोषने अशी काही घोषणा केली की त्यावर कोणालाही सहजासहजी विश्वास बसणार नाही. आशुतोषने केलेल्या घोषणेनुसार, तो लवकरच इंडस्ट्रीमधील तिन्ही खानला सोबत घेऊन चित्रपट बनविणार आहे. कदाचित यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, परंतु आशुतोष तिघांना एकत्र आणण्यासाठी सध्या धडपड करीत आहे. आशुतोषने त्याच्या ट्विटरवर लिहिले की, त्याच्या पुढच्या चित्रपटात शाहरूख, सलमान आणि आमिर एकत्र स्क्रिनिंग शेअर करताना दिसणार आहेत. आता आशुतोषची ही घोषणा प्रथमदर्शनी अशक्य वाटत असली तरी, त्याच्या या घोषणेत अजिबातच दम नाही, असे म्हणणेही जरा घाईचेच ठरेल. आशुतोषने आतापर्यंत कित्येक बड्या स्टार्सना सोबत घेऊन चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र सलमान, शाहरूख, आमिर अद्यापपर्यंत एकाही चित्रपटात एकत्र आलेले नसल्याने आशुतोषच्या या प्रयत्नांना यश येईल का? याविषयी मनात शंका येणे स्वाभाविक आहे. आशुतोषच्या या ट्विटनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण सगळेच हा विचार करीत आहेत की, असे खरंच होऊ शकते का? अनेकांनी तर आशुतोषला फोन करून याविषयीचा अधिक उलगडा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे कदाचित आशुतोषने १ एप्रिलचा मुहूर्त साधून त्याच्या फॅन्सना एप्रिलफुल तर केले नसेल ना, असाही सूूर व्यक्त केला जात आहे.