Join us

​‘बेगम जान’मधून चाहत्यांच्या कानी पडणार आशा भोसलेंचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 21:20 IST

आशा भोसले बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटातील एका गाण्यात ...

आशा भोसले बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटातील एका गाण्यात आशा भोसले यांचा आवाज चाहत्यांच्या कानी पडणार आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन अनू मलिक यांनी केले आहे. आशा ताईंनी गायलेले हे गाणे विद्या बालन पडद्यावर गाताना दिसेल. संगीतकार अनू मलिक व आशा भोसले देखील अनेक वर्षांनतर एकत्र काम करीत आहेत. हिंदी, मराठी सह अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपटासाठी आशा भोसले यांनी हजारो गाण्यांसाठी पार्श्वगायन केले आहे. स्वर कोकीळा लता मंगेशकर यांच्यानंतर सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून आशा भोसले यांचा उल्लेख केला जातो. आजही त्यांच्या आवाजाची जादू चाहत्यांच्या मनात घर करून आहे. यामुळेच विद्या बालनच्या आगामी चित्रपटात आशा भोसले यांच्या आवाजात गाणे रेकॉड करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संगीतकार अनू मलिक यांनी दिली. ‘राजकहिनी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटाचे कथानक ऐतिहासिक पाश्वभूमीवर आधारित आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट व मुकेश भट्ट करीत आहेत. ‘बेगम जान’ या चित्रपटाचे संगीत अनू मलिक यांनी दिले असून सोनू निगम, राहत फतेह अली खान, श्रेया घोषाल या गायकांसोबतही त्यांनी रेकॉडिंग केले आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालनसोबतच अभिनेत्री गौहर खानही दिसणार आहे. आशा भोसले यांनी याआधीही ‘३१ आॅक्टोबर’ या चित्रपटासाठी गाणे गायले होते. मात्र त्याची फारशी दखल घेण्यात आली नाही. आता बेगम जानमधून पुन्हा एकदा आशा भोसले यांचा आवाज चाहत्यांच्या कानी पडेल.