बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी. त्यांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. राजेश खन्नांच्या निधनानंतर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे अनिता अडवाणीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टारसोबतच्या रिलेशनशिप आणि अफेअरवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनिता अडवाणी स्पष्टपणे बोलली आहे. या मुलाखतीत तिने अनेक खुलासेदेखील केले आहेत.
अनिता अडवाणीने नुकतीच 'रील मीट रियल' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ती राजेश खन्नांबद्दल म्हणाली, "जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा मी टीनेजर होते. खूप कमी वयातच आमच्यात रोमान्स सुरू झाला होता. त्यांनी माझ्या मनावर आणि हृदयावर अशी छबी सोडली की त्यानंतर मला कोणी दुसरं आवडलच नाही. पण, त्यानंतर मात्र नियतीने तिचं काम केलं. आम्ही अनेक वेळा एकमेकांना भेटलो. आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यातून सर्व निघून गेले. त्यांच्या कुटुंबापैकी एकही सदस्य त्यांच्यासोबत नव्हता. तेव्हा आम्ही पुन्हा भेटलो आणि नंतर जवळपास १२ वर्ष एकत्र राहिलो".
"त्यांच्यापेक्षा चांगली व्यक्ती असूच शकत नाही. ते लाखात एक होते. मी खूपच लहान असताना त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. मला वाटायचं की तेच माझं सर्वस्व आहेत. मी थोडी मोठी झाल्यानंतर अनेक जण माझ्या लागले होते. पण, राजेश खन्नांवरील प्रेमापुढे मला काहीच दिसलं नाही. मी त्यांच्यात तुलना करायचे. कोणत्या दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मी सहन करू शकत नव्हते", असंही अनिता अवडवाणीने सांगितलं.
अनिताला राजेश खन्नांना भेटण्याची परवानगी नव्हती. ती राजेश खन्नांना भेटू नये म्हणून बंगल्याबाहेर बाऊन्सर ठेवण्यात आले होते. तिने सांगितलं की "मला माझ्या मित्रांकडून ही गोष्ट समजली होती. पण, तरीही माझ्या मित्रांनी मला तिथे जाण्याचा सल्ला दिलेला. काही झालं तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. काहींनी मला असंही सुचवलं होतं की एक कॅमेरा घेऊन जा. जेणेकरून काही झालंच तर तुला रेकॉर्ड करता येईल. पण, मी विचार केला की अशा वेळी मी असं कसं करू शकते...म्हणून मी तिथे गेले नाही".