Join us

अमिताभ बच्चनने केला १२ वर्षांनंतर खुलासा; ‘ब्लॅक’साठी रुपयाही घेतला नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 22:10 IST

संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या सुपरहिट सिनेमाला शनिवारी (दि.४) बारा वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त महानायक अमिताभ बच्चन ...

संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या सुपरहिट सिनेमाला शनिवारी (दि.४) बारा वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त महानायक अमिताभ बच्चन खूपच भावुक झाल्याचे बघावयास मिळाले. ‘ब्लॅक’च्या आठवणी ताज्या करताना अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवरून खुलासा केला की, या सिनेमासाठी एक रुपयाही मानधन घेतले नव्हते. अमिताभ बच्चन यांनी लिहले की, जेव्हा सिनेमाच्या सेटला आग लागली होती, तेव्हा मी आणि रानी मुखर्जी दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या घरी गेलो होतो. तसेच सर्व दृश्य पुन्हा चित्रित करण्यास तयार झालो होतो. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण टीममध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारलेला होता. त्यावेळेस मी नाशिकमध्ये एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो, अशात भन्साळी यांनी नाशिक गाठून मला पटकथा ऐकविली होती. त्यांनी एका काळ्या रंगाच्या फाइलमध्ये लिहिलेला मजकूर वाचण्यास सुरुवात केली. काही लाइन वाचल्यानंतर ते मध्येच थांबले अन् म्हणाले, अमिताभजी मी खूपच वाईट कथावाचक आहे. त्यामुळे पटकथा तुम्हीच वाचा असे म्हणून मुंबईला रवाना झाले. अमिताभ यांनी भन्साळीचे कौतुक करताना म्हटले की, संजय भन्साळी हे खूपच सूक्ष्म पद्धतीने विचार करणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या याच कौशल्यामुळे अभिनय करण्यासाठी एकप्रकारची वातावरण निर्मिती होती. ४ फेब्रुवारी २००५ रोजी रिलिज झालेला हा सिनेमा हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात रानी मुखर्जीने नेत्रहीन युवतीची भूमिका साकारली होती, तर अमिताभ यांनी तिच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संजय लीला भन्साली यांचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून रणबीर कपूर याने काम पाहिले होते. या सिनेमासाठी अमिताभ यांना बेस्ट अ‍ॅक्टरचा राष्टÑीय पुरस्कार मिळाला होता. या आठवणींनाही उजाळा देताना अमिताभ म्हणाले की, खरं तर या सिनेमात काम करणे परिश्रमिक होते. त्यासाठी मानधन घेण्याचा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. पण काहीही असो अमिताभ यांच्या या भावनिक ब्लॉगमुळे सिनेमाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या हे मात्र नक्की.