गेल्या ३-४ दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह मुंबई आणि उपनगरात पाऊस अक्षरश: कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईत कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसला आहे. बिग बींच्या बंगल्यात पावसाचं पाणी शिरलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईतील जुहू येथे अमिताभ बच्चन यांचा प्रतिक्षा हा बंगला आहे. बिग बींच्या या प्रतीक्षा बंगल्यात पावसाचं पाणी शिरलं आहे. याचा व्हिडीओ एका ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पाणी शिरल्याचं दिसत आहे. "अमिताभ बच्चन स्वत: वायपर घेऊन पाणी काढायला आले होते. तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी मुंबईच्या पावसापासून कोणीच वाचू शकत नाही", असं व्हिडीओत ती व्यक्ती म्हणताना दिसत आहे.
प्रतीक्षा बंगल्यात आता अमिताभ बच्चन राहत नसले तरी हा बंगला त्यांनी लेक श्वेता बच्चनच्या नावावर केला आहे. शोले सिनेमा हिट झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी हा बंगला खरेदी केला होता. याच बंगल्यात श्वेता बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला होता. सुरुवातीला अमिताभ बच्चन कुटुंबासह या बंगल्यात राहत होते. आता ते जुहू येथेच असलेल्या जलसा बंगल्यात राहतात.