या कारणामुळे आलिया भट्टच्या आईने ठेवले तिचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 12:52 IST
१९९९ मध्ये अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा यांच्या संघर्ष या चित्रपटात आलिया भट्ट बालकलाकार म्हणून झळकली होती. या चित्रपटातील ...
या कारणामुळे आलिया भट्टच्या आईने ठेवले तिचे नाव
१९९९ मध्ये अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा यांच्या संघर्ष या चित्रपटात आलिया भट्ट बालकलाकार म्हणून झळकली होती. या चित्रपटातील ही चिमुरडी आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. त्यानंतर २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ द ईअर या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून तिने डेब्यू केला. या चित्रपटासाठी ५०० हून अधिक मुलींनी ऑडिशन दिले होते. यातून आलियाची निवड करण्यात आली. पण तीन महिन्यांत १६ किलो वजन कमी कर, या अटीवर करण जोहरने तिला या चित्रपटात घेण्याचे ठरवले होते. स्टुडंट ऑफ द ईअर या पहिल्याच चित्रपटातील आलियाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये प्रत्येक अभिनेत्री ग्लॅमरस भूमिकेलाच पसंती देते. पण आलिया दुसऱ्याच चित्रपटात प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली. हाय वे या चित्रपटाद्वारे ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे तिने सिद्ध केले. या चित्रपटानंतर उडता पंजाब या चित्रपटात देखील प्रेक्षकांना एक वेगळी आलिया पाहायला मिळाली. आलिया भट्ट ही प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. तिची आई सोनी राझदान ही देखील एक अभिनेत्री आहे. आपल्या आईसोबत एखाद्या तरी चित्रपटात काम करण्याची आलियाची इच्छा आहे. आलियाचे नाव देखील तिच्या आईने ठेवलेले आहे. आलियाचे नाव ठेवण्यामागचा किस्सा तिच्या आईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियाद्वारे सांगितला आहे. आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोनी राझदान यांनी तिचे काही लहानपणीचे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यासोबत एक छानशी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, २५ वर्षांपूर्वी आलिया तू जन्मलीस. तुझा जन्म होण्यापूर्वीच माझ्या बाळाचे नाव काय ठेवायचे हे मी ठरवले होते. आलिया नाईटली ही एक प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल होती. तिचे नाव ऐकल्यानंतर माझ्या मुलीचे नाव देखील आलिया ठेवायचे असे मी ठरवले आणि तुझ्या वडिलांनी देखील या गोष्टीला लगेचच होकार दिला. त्या शब्दाचा अर्थ काय हे देखील मला त्यावेळी माहीत नव्हते. मला अनेक वर्षांनी कळले की, याचा अर्थ उदार असा होतो आणि खरंच तू दुसऱ्यांना तुझी कोणतीही गोष्ट द्यायला कधीही तयार असते. तू या नावासाठी अतिशय योग्य आहे. Also Read : हॅपी बर्थ डे आलिया भट्ट! जाणून घ्या, ‘चुलबुली गर्ल’च्या काही खास गोष्टी!!