Alia Bhatt Ncb Drugs Free Bharat Campaign: गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड आणि ड्रग्ज हे समीकरण चर्चेत आहे. अनेक मोठ्या कलाकारांची नावे यात जोडली गेली. दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंग, रणवीर सिंग ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. भारतात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. जर कोणी असे करताना आढळल्यास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) त्यांच्यावर कठोर कारवाई करते. आता २०२५ मध्ये, एनसीबीने 'नशामुक्त भारत'साठी अधिक आक्रमक मोहीम सुरू करण्याचा निर्धार केला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून लोकप्रिय अभिनेत्री आलिया भटने एनसीबीसोबत काम करतेय.
आलिया ही समाजासाठीही जबाबदारीने पुढे येताना दिसली आहे. नुकतीच तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चंदीगडसोबत ड्रग्जविरोधी जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. 'ड्रग्जला नाही' म्हणत ई-प्रतिज्ञा घेण्याचं तिने आवाहन केलं आहे. आलियाचा एक व्हिडीओ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) चंदीगड विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलाय. ज्यात आलिया म्हणते, "नमस्कार मित्रांनो, मी आलिया भट आहे, आज मला ड्रग्ज व्यसनाच्या एका गंभीर समस्येबद्दल बोलायचं आहे".
पुढे ती म्हणते, "ड्रग्ज आपल्या जीवनासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कसे धोकादायक आहे, याबद्दल बोलायचे आहे. ड्रग्जविरुद्धच्या या विशेष मोहिमेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला पाठिंबा द्या. जीवनाला हो म्हणा आणि ड्रग्जला नाही म्हणा. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ड्रग्जविरुद्ध ई-प्रतिज्ञा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही एनसीबीबरोबर जोडले जाऊ शकता, जय हिंद".