Join us  

"देशाचे तुकडे करणं थांबवा, कारण हे काम तर...", अक्षय कुमार अखेर स्पष्टच बोलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:38 PM

पृथ्वीराज चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी अक्षयनं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

मुंबई-

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'पृ्थ्वीराज' चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र आहे. अक्षय कुमार या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर प्रमुख अभिनेत्री आहे. पृथ्वीराज चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी अक्षयनं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री असा एक वाद सुरू आहे. दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप यांनी हिंदी भाषेसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर अभिनेता अजय देवगण यानं त्याला ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं. याच मुद्द्यावरुन दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलीवूडमध्ये गेल्या दिवसांपासून वाद-विवाद सुरू आहे. याच मुद्द्यावर अक्षय कुमारला विचारण्यात आलं असता त्यानं आपलं मौन अखेर सोडलं. 

"मी आज यामुद्द्यावर आपलं मत आता व्यक्त करतोच. तुम्ही आधी साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया किंवा बॉलीवूड असं जर बोलत असाल तर तुम्ही असं का बोलत आहात याचा विचार करायला हवा. ते काय म्हणतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ही एकच इंडियन फिल्म इंडस्ट्री आहे. दाक्षिणात्य सिनेमे चालावेत आणि आपलेही सिनेमे चालावेत हेच मला वाटतं. आज जे होत आहे तेच स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देखील होत होतं. तुकडे पाडण्याचं काम तर ब्रिटिशांनी केलं होतं. त्यांनी भारताची इस्ट इंडिया, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया अशी विभागणी केली. कोण काय म्हणतं याचा मला फरक पडत नाही. पण माझा विचार काय आहे आणि त्यावर माझी प्रतिक्रिया काय असायला हवी हे मला महत्वाचं वाटतं", असं अक्षय कुमार म्हणाला. 

"एखाद्या गोष्टीकडे आपण कसं पाहातो त्यावर सारंकाही अवलंबून आहे. आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो आणि देशाला आपण काय देऊ शकतो याचा विचार आपण करायला हवा. ते काय बोलताहेत आणि आपण काय बोलतोय, काय उत्तर देतोय यामधून काय मिळणार आहे? कुणी काही बोललं तरी ही एकच चित्रपटसृष्टी आहे. आपण सगळे एक आहोत. मला तर वाटतं की त्यांचेही चित्रपट चालावेत आणि आपलेही चालावेत. तेव्हाच तर आपण फायद्यात असू", असंही अक्षय पुढे म्हणाला. 

मला आजही लक्षात आहे की एक वेळ अशी होती की संपूर्ण सिनेमाचं बजेट एकेकाळी १५ लाख असायचं. आज एक सिनेमा २५० ते ४०० कोटींच्या बजेटचा असतो. यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा जितका हात आहे तितकाच आपलाही आहे. त्यामुळे दोघांमध्ये फूट पाडण्याची चर्चा सुरू झाली आहे ती किती दुर्दैवी आहे हे समजून घ्यायला हवं. इंडस्ट्रीचे तुकडे पाडणं बंद करा. यामागे नक्कीच कुणाचा तरी हात आहे. त्यापासून आपण सतर्क राहायला हवं, असं अक्षयनं म्हटलं. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडTollywood