बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार लवकरच वेब दुनियेत पदार्पण करतोय. अक्षयची पहिली-वहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने या वेबसीरिजची घोषणा केली होती. या वेब सीरिजच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये शरीराला आग लावत अक्षय रॅम्पवर उतरला होता. हे करताना, संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. आगीमुळे शरीर पोळू नये यासाठी अक्षयच्या शरीरावर लेपही लावण्यात आला होता. पण तरिही अक्षयचा हा स्टंट पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. त्याचा हा स्टंट पाहून पत्नी ट्विंकलही जाम भडकली होती. अक्षयच्या याच वेबसीरिजबद्दल एक फक्कड बातमी आहे.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने ९० कोटी रूपयांत ही वेब सीरिज साईन केली. अर्थात अक्षयच्या टीमने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अक्षयची पहिली वेब सीरिज अॅक्शन स्टंटवर आधारित आहे. तूर्तास ‘द एंड’असे तात्पुरते नाव या वेबसीरिजला देण्यात आले आहे. तूर्तास अक्षयने अनेक फिल्मी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. हे प्रोजेक्ट संपताच अक्षय या वेबसीरिजचे शूटींग सुरू करेल. यावर्षाच्या अखेरिस ही वेबसीरिज प्रदर्शित होईल. वेब सीरिजच्या अन्य स्टारकास्टची घोषणा अद्याप बाकी आहे. पण अक्षयच्या उपस्थितीमुळे वेब सीरिजची चर्चा जोरात आहे.