Join us

संजय लीला भन्सालीच्या या चित्रपटात झळकणार ऐश्वर्या रॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 13:18 IST

संजय लीला भन्सालीने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात ऐश्वर्या प्रमुख भूमिकेत झळकली आहे. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या संजयच्या एका चित्रपटात ...

संजय लीला भन्सालीने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात ऐश्वर्या प्रमुख भूमिकेत झळकली आहे. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या संजयच्या एका चित्रपटात काम करणार आहे. पद्मावती या संजयच्या आगामी चित्रपटात दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण त्यांच्यासोबतच ऐश्वर्या या चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.संजयने दिग्दर्शित केलेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटात ऐश्वर्या रॉयने प्रमुख भूमिका साकारली होती. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमत्रिकोणावर आधारित असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि ऐश्वर्याचे अफेअर सुरू असल्याने त्यांची खूपच छान केमिस्ट्री प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाली होती. यानंतर संजयच्या देवदास या चित्रपटातही ऐश्वर्या झळकली. या चित्रपटासाठीदेखील ऐश्वर्याला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. ऐश्वर्या ही खूपच चांगली अभिनेत्री असल्याचे संजय नेहमीच सांगतो. बाजीराव मस्तानी हा संजयचा महत्त्वकांक्षी चित्रपट असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात मस्तानीची भूमिका दीपिका पादुकोणने साकारली होती. पण या भूमिकेसाठी संजयची पहिली पसंती ही ऐश्वर्यालाच होती. पण काही कारणास्तव ऐश्वर्या या चित्रपटाचा भाग बनू शकली नाही. पण ऐश्वर्यासोबत काम करण्याची इच्छा संजय पद्मावती या त्याच्या आगामी चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहे.  संजयने दिग्दर्शित केलेल्या गुजारिश या चित्रपटात ऐश्वर्याने शेवटचे त्याच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागला होता. पण तरीही ऐश्वर्याच्या कामाचे कौतुक सगळ्यांनी केले होते. ऐश्वर्या लवकरच पद्मावती या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.