ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 19:51 IST
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय (७२) यांनी आज सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत ...
ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय यांचे निधन
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे वडील कृष्णराज राय (७२) यांनी आज सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते; मात्र दिवसाआड त्यांची तब्येत खालावत गेल्याने आज त्यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात ऐश्वर्यासह संपूर्ण बच्चन कुटुंब कृष्णराज राय यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये गेल्याचे बघावयास मिळाले होते. सूत्रानुसार त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना आयसीयू रूममध्ये शिफ्ट करीत व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची तब्येत खूपच नाजूक होती. पिंकविलाच्या वृत्तानुसार त्यांच्या तब्येतीत अखेरपर्यंत सुधारणा होत नव्हती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल झाली होती. त्यामुळेच ऐश्वर्याचे सर्व नातेवाईक त्यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. माध्यमांशी बोलताना एका सोर्सने सांगितले की, ऐश्वर्याचे वडील गेल्या दोन आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. अभिषेक शूटिंगनिमित्त बाहेर देशात असल्याने ऐश्वर्या वडिलांची काळजी घेत होती. नुकताच आराध्याच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला होता. त्यावेळी ऐश्वर्याला चांगलीच कसरत करावी लागली. कारण शाळेत उपस्थिती लावताना वडिलांच्या तब्येतीचीदेखील सातत्याने विचारणा करावी लागली. दरम्यान, अभिषेक विदेशातून परतला असून, तो आता ऐशबरोबर आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णराज राय कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीत बरीचशी सुधारणा झाली होती; मात्र पुन्हा त्यांना याबाबतचा त्रास जाणवायला लागल्याने त्यांची तब्येत अचानक खालावली होती. दरम्यान, लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचे व्याही अमिताभ बच्चन यांनी त्यांची भेट घेतली होती.