Join us

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनविषयी झीनत अमान यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून तुम्हाला आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:08 IST

झीनत अमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे.

ठळक मुद्देअभिषेक लहान असताना माझ्या दरवाजाची बेल वाजवायचा आणि पळून जायचा. माझी बेल वाजवून कोण पळतंय हेच मला कळायचे नाही. ही गोष्ट सतत होत होती. अनेक दिवसांनी मी अभिषेकला असे करताना रंगेहाथ पकडले, त्यावेळी हा पोरगा किती मस्तीखोर आहे हे मला कळले. 

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअ‍ॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. 

येत्या आठवड्यात या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू, झीनत अमान आणि अरुणा इराणी हजेरी लावणार आहेत. त्या स्पर्धक आणि परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासोबत मौज मस्ती करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान झीनत अमान यांनी देव आनंद आणि राज कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच बॉलिवूडमधील त्यांच्या प्रवासाविषयी सांगितले. तसेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनविषयी एक खास गोष्ट सांगितली.

झीनत अमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. डॉन या चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यावर सुपर डान्सर 3 या कार्यक्रमातील एका स्पर्धकाने परफॉर्मन्स सादर केला असता त्यांनी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिषेक लहान असताना खूप खट्याळ होता आणि त्याचा अनुभव अनेकवेळा झीनत अमान यांना आलेला आहे. याविषयी त्या सांगतात, अभिषेक लहान असताना माझ्या दरवाजाची बेल वाजवायचा आणि पळून जायचा. माझी बेल वाजवून कोण पळतंय हेच मला कळायचे नाही. ही गोष्ट सतत होत होती. अनेक दिवसांनी मी अभिषेकला असे करताना रंगेहाथ पकडले, त्यावेळी हा पोरगा किती मस्तीखोर आहे हे मला कळले. 

अभिषेकच नव्हे तर त्याची पत्नी ऐश्वर्या रायदेखील खूप मस्तीखोर असल्याचे झीनत यांचे म्हणणे आहे. त्या सांगतात, एकदा मी अभिषेक आणि ऐश्वर्याला घरी बोलावले होते तर ते दोघे बेल वाजवून पळाले होते. 

सुपर डान्सर हा कार्यक्रम आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे चांगल्या डान्सरला मत देऊन त्याला ‘डान्स का कल’ हा किताब जिंकण्यात मदत करण्याची जबाबदारी आता प्रेक्षकांवर आली आहे. प्रेक्षक सोनीलिव्ह अ‍ॅप डाऊनलोड करून आपल्या आवडत्या स्पर्धकाला सुपर 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी मत देऊ शकतात.

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनझीनत अमान