Join us

​अखेर ऐ दिल है मुश्किल होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 11:32 IST

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकाराला बॉलिवूडच्या चित्रपटात झळकू देणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. ए दिल ...

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकाराला बॉलिवूडच्या चित्रपटात झळकू देणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. ए दिल है मुश्किल या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खानची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात अनेक अडथळे आले होते. त्यानंतर या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने राजनाथ सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली असून हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.ऐ दिल है मुश्किल’ च्या प्रदर्शनाला असलेला मनसेचा विरोध अखेर मावळला आहे. त्यामुळे आता आपल्या ठरलेल्या तारखेलाच म्हणजेच 28 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी करत राज ठाकरे आणि निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलावलं. या तिघांमध्ये साधारणपणे तासभर बैठक झाली. बैठकीनंतर निर्माते मुकेश भट्ट यांनी हा गुंता सुटल्याची माहिती दिली. तसेच यापुढे पाक कलाकारांना कोणत्याही सिनेमात घेणार नाही. सिनेमाच्या उत्पन्नाची ठरावीक रक्कम शहीदांच्या कुटुबियांना दिली जाईल असे आश्वासनही मुकेश भट्ट यांच्याकडून देण्यात आले.ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.