Join us  

Rashtra Kavach Om Review: आदित्य रॉय कपूरची अ‍ॅक्शन अन् काय काय..., जाणून घ्या कसा आहे ‘राष्ट्र कवच- ओम’ हा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 5:23 PM

Rashtra Kavach OM Movie Review in Marathi : पदार्पणात रोमँटिक भूमिकेत लोकप्रिय झालेल्या आदित्य रॉय कपूरनं या चित्रपटात अ‍ॅक्शनमध्ये आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे....

- संजय घावरे

...........................

दर्जा :  2 स्टार  कलाकार :आदित्य रॉय कपूर, आशुतोष राणा, प्रकाश राज, जॅकी श्रॉफ, संजना सांघी, प्राची शाह पांड्यादिग्दर्शक : कपिल वर्मानिर्माता : झी स्टुडिओज, अहमद खान, शायरा खानशैली : अ‍ॅक्शन थ्रीलरकालावधी : २ तास १५ मिनिटे...........................

Rashtra Kavach OM Movie Review in Marathi :    काही चित्रपटांकडून खूप अपेक्षा असतात. त्यावर अमाप पैसे खर्च केले जातात, पण असे चित्रपट जेव्हा निराश करतात तेव्हा खूप वाईट वाटतं. या चित्रपटानंही तोच कित्ता गिरवला आहे. मोठमोठे कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्ये, धडाकेबाज अ‍ॅक्शन असूनही जर कथेचा गाभाच खिळवून ठेवणारा नसेल, तर त्याचा काही उपयोग होत नाही. कपिल वर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट मोठ्या घरच्या पोकळ वाशाप्रमाणं आहे. बाहेरून चमकदार पण आत काहीच नाही.

कथानक : चित्रपटाची कथा राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीभोवती गुंफण्यात आली आहे. यात काम करणाऱ्या ओम राठोडच्या डोक्याला गोळी लागते आणि त्याची स्मरणशक्ती जाते. त्याला स्वप्नं पडू लागतात. त्यात त्याला आपलं नाव ऋषी असल्याचं जाणवतं. आग लागलेल्या घरातून ऋषीच्या वडीलांना दोन व्यक्ती खेचून नेत असतात. वडील ऋषीला पळून जायला सांगत असल्याचं ओमला स्वप्नात दिसतं. वास्तवात मात्र ओमच्या काकांनी म्हणजेच त्याचे वरीष्ठ अधिकारी आणि काकी यांनीच त्याचा सांभाळ केलेला असतो, पण स्मरणशक्ती गेल्यानं तो त्यांना ओळखत नसतो. स्मरणशक्ती जाण्यापूर्वी ओम न्यूक्लीअर हल्ला परतवून लावण्याची शक्ती असणाऱ्या सुरक्षा कवचाचा शोध घेत असतो. त्याच्यावर कोण हल्ला करतो, सुरक्षा कवच परत मिळतं का आणि ओमचे बाबा जीवंत असतात का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथा विशेष प्रभावी नाही. यापूर्वी बऱ्याचदा समोर आलेला विषय थोड्या वेगळ्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. त्यामुळं दिग्दर्शनातही विशेष कमाल करण्यास कपिल वर्मांना वाव नव्हता.

एका सुमार कथेवर तितकीच ढिसाळ पटकथा लिहिण्यात आल्यानं प्रभावहीन सिनेमा पहावा लागतो. पुढल्या दृश्यात काय घडणार, या सर्वांमागे कोण असणार या सर्वांचा अंदाज अगोदरच लागणं हे लेखकाचं अपयश आहे. त्यात बदल न करता आपलं कला कौशल्य न दाखवणं हा दिग्दर्शकाचा दोष आहे. सुरक्षा कवचसारखा राष्ट्रीय सुरक्षेचा एखादा हुक केंद्रस्थानी ठेवून आजवर बरेच चित्रपट बनण्यात आले आहेत. त्यामुळं विषयात जराही नावीन्य नाही. नॅशनल सिक्युरिटीचा एखादा मुद्दा दाखवताना फार डिटेलिंगवर काम करावं लागतं, पण यात तसं काही केल्याचं जाणवत नाही. चित्रपट फार मोठा न करता थोडक्यात आटोपता घेण्यात आला ते बरं केलं आहे. यातील अ‍ॅक्शन सीन्स कमालीची आहेत. कॅमेरा आणि ग्राफिक वर्क चांगलं आहे. गाणी ठीकठाक आहेत. इतर तांत्रिक बाबीही चांगल्या आहेत.

अभिनय : पदार्पणात रोमँटिक भूमिकेत लोकप्रिय झालेल्या आदित्य रॉय कपूरनं अ‍ॅक्शनमध्ये आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. लक्ष वेधून घेणारी अ‍ॅक्शन दृश्ये त्यानं केली आहेत. संजना सांघीनंही अ‍ॅक्शनमध्ये कमाल केली असली तरी तिच्या कॅरेक्टरला फार वाव नाही. आशुतोष राणांनी सकारात्मक भूमिका अत्यंत सहजपणे साकारली आहे. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत प्राची शाह पांड्यानं चांगलं काम केलं आहे. जॅकी श्रॉफनं नेहमीच्या शैलीत साकारलेला खलनायक यात आहे. प्रकाश राजही त्याच्या साथीला असल्याचं पडद्यावर दाखवण्यापूर्वीच जाणवतं. एलनाझ नौरोजीनं ‘काला शा काला...’ या आयटम नंबरमध्ये आपल्या मादक अदाकारीनं रंगत आणली आहे.

सकारात्मक बाजू : आदित्य रॉय कपूर आणि त्याच्या सहकलाकारांची अ‍ॅक्शन दृश्ये पाहण्याजोगी झाली आहेत.

नकारात्मक बाजू : विषयात नावीन्य नसल्यानं चित्रपट निराश करतो. पुढे काय घडणार याची चाहूल अगोदरच लागते.

थोडक्यात : आदित्यच्या फॅन्ससोबतच अ‍ॅक्शनच्या चाहत्यांना हा चित्रपट आवडू शकतो. त्यामुळं त्यांनी एकदा चान्स घ्यायला हरकत नाही. इतरांनी हा चित्रपट पहायचा की नाही याचा निर्णय स्वत:च घ्यावा.

टॅग्स :आदित्य रॉय कपूरबॉलिवूडसिनेमा