या अभिनेत्रीसोबत होते अमजद खान यांचे अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 18:28 IST
अमजद खान यांनी शोले या चित्रपटात साकारलेल्या गब्बर या भूमिकेमुळे आजही ते प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. त्यांनी या चित्रपटाशिवाय ...
या अभिनेत्रीसोबत होते अमजद खान यांचे अफेअर
अमजद खान यांनी शोले या चित्रपटात साकारलेल्या गब्बर या भूमिकेमुळे आजही ते प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. त्यांनी या चित्रपटाशिवाय याराना, हिमतवाला यांसारख्या चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी द परफेक्ट मर्डर या इंग्रजी चित्रपटातदेखील एक महत्त्वाची भूमिका साकारली होती.अमजद खान हे पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारत असले तरी ते खऱ्या आयुष्यात स्वभावाने खूपच चांगले होते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते त्यांच्या सहकलाकारांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.अमजद खान हे सुरुवातीच्या काळात तितकेसे लठ्ठ नव्हते. पण द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते गोव्याला गेले होते. गोव्यावरून परतताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांना चांगलीच दुखापत झाली होती. पण त्यावेळी त्यांच्या शरीरावर औषधांचा मारा झाल्याने त्यांचे वजन अचानक खूपच जास्त वाढले. अमजद खान यांचे अभिनेत्री कल्पना अय्यर यांच्यावर प्रचंड प्रेम होते. कल्पना आणि अमजद यांच्यात वयाचे अंतर होते. पण तरीही त्या दोघांनी त्या गोष्टीचा कधीही विचार केला नाही. अमजद आणि कल्पनाची ओळख एका स्टुडिओत झाली होती. ते दोघे एकाच स्टुडिओत वेगवेगळ्या चित्रपटांचे चित्रीकरण करत होते. पण कल्पना आणि अमजद यांची पहिल्याच भेटीत चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कल्पना आणि अमजद यांच्या नात्याबद्दल काहीच दिवसांत मीडियात देखील बातम्या येऊ लागल्या होत्या. पण अमजद यांचे लग्न झालेले होते. त्यांना तीन मुलेदेखील होती. आपल्यामुळे अमजद यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होऊ नये म्हणून कल्पनाने त्यांच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण अखेरपर्यंत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. अमजद यांच्या मृत्युनंतरदेखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कल्पना गेली होती.