Join us  

Big News : कंगना रणौत पुढच्या चित्रपटात होणार इंदिरा गांधी; आणीबाणी अन् ऑपरेशन ब्लूस्टारचाही असणार उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 3:07 PM

Kangana Ranaut as Indira Gandhi : या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारदेखील दर्शविले जाणार आहेत.

नवी दिल्ली - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत पुन्हा एकदा पॉलिटिकल चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल. कंगनाने अद्याप या चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. मात्र, हा चित्रपट इंदिरा गांधींची बायोपिक नसेल, तसेच या चित्रपटात अनेक मोठे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील, असे तिने म्हटले आहे.

थलाइवी नंतर कंगनाचा हा दुसरा पॉलिटिकल चित्रपट असेल. चित्रपटासंदर्भात बोलताना कंगना म्हणाली, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही, ना इंदिरा गांधीं यांचा बायोपिक होणार आहे. या चित्रपटात आणखीही  काही दिग्गज कलाकार दिसतील. सध्या आम्ही प्रोजेक्टवर काम करत आहोत. तसेच स्क्रिप्ट फायनल स्टेजला आहे. ही एक ग्रँड पिरियड फिल्म आहे. यामुळे आजच्या पिढीला भारताची राजकीय स्थिती समजून घेण्यास मदत होईल. 

कंगना म्हणाली, मी भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिकल लीडरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका पुस्तकावर आधारलेला आहे. मात्र, तिने या पुस्ताकाचे नाव सांगितलेले नाही. या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील दोन मोठे निर्णय आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारदेखील दर्शविले जाणार आहेत.

कंगनासोबत पूर्वी काम केलेले डायरेक्टर साई कबीर, हे या चित्रपटाचेही दिग्दर्शन करतील. याच बरोबर त्यांनी स्क्रिप्टदेखील लिहिली आहे. हा चित्रपट ग्रँड लेवलवर तयार होणार आहे. यात संजय गांधी, राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्रींसारख्या अनेक नेत्यांच्या भूमिका आहेत.

कंगना रणौत सध्या भोपाळ येथे धाकड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यानंतर ती तेजसमध्ये दिसेल. याशिवाय तिने नुकतेच 'अपराजित अयोध्या' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स' चीही घोषणा केली आहे.

कंगना रणौत सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. ती प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत मांडते. सध्याच्या मोदी सरकारचे समर्थन करणारी कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसोबत न्याय करू शकेल का?  हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या वर्षीच कंगनाच्या आईने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

टॅग्स :कंगना राणौतसिनेमाबॉलिवूड