Join us

मराठमोळ्या या अभिनेत्रीने निभावली सीता मातेची भूमिका, म्हणतेय-'माझ्या जीवनातील इच्छा झाली पूर्ण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:09 IST

दोन दिवसांपूर्वी अयोध्येत रामलीला सादर करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी अयोध्येत रामलीला सादर करण्यात आली. दूरदर्शन वाहिनीवर या सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करण्यात आले होते. भव्यदिव्य अशा या महाकाव्याचे सादरीकरण अनेक कलाकारांच्या अभिनयाने चांगलेच रंगले होते. नवरात्रीचे औचित्य साधून अयोध्यातील शरयू नदीच्या किनारी एका मैदानात रामलीलाचे सादरीकरण करण्यात आले होते. यात मराठमोळी आणि बॉलिवूडची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिने सीता मातेची भूमिका निभावली होती. या भूमिकेबाबत भाग्यश्री म्हणाली की, माझ्या जीवनातील एक इच्छा आज पूर्ण झाली आहे. सीता मातेच्या गेटअपमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत होती. तिथल्या प्रेक्षकांनी देखील भाग्यश्रीला पाहून तिचे खूप कौतुक केले होते.

भाग्यश्री सोबत बॉलिवूडचे आणखी बरेचसे कलाकार या सोहळ्यात एकत्रित झळकले होते. दूरदर्शन वाहिनीवर रामलीला लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आले होते त्यावेळी जगभरातील तब्बल १९ कोटी लोकांनी हा सोहळा पाहण्याचा आनंद लुटला होता. त्यामुळे दूरदर्शन वाहिनीचे अनेकांनी आभार मानले आहेत. हा सोहळा सुरू होण्याअगोदर भाग्यश्रीने हनुमान गढीचे दर्शन घेतले होते ‘यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमची यात्रा सुरू होऊ शकत नाही’ असे तिने म्हटले होते. 

भाग्यश्री नुकतीच कंगना रानौत अभिनीत थलाइवी या चित्रपटात जयललिता यांच्या आईच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते. लवकरच ती पूजा हेगडे आणि प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या राधे श्याम या चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :भाग्यश्री