मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने (athiya shetty) इंडस्ट्री कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः सुनील यांनी याविषयी खुलासा केलाय. त्यामुळे अथियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. २०१५ मध्ये अथियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी अथियाने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच आई झाल्याने अथियाने आईपणाची नवी भूमिका पार पाडण्याचं ठरवलं आहे.
अथियाने बॉलिवूड कायमचं सोडलं
सुनील शेट्टी यांच्या मते अथियाने अभिनय क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. तिच्या शेवटच्या चित्रपटानंतर तिला अनेक प्रस्ताव आले होते, परंतु तिने कोणताही चित्रपट स्वीकारला नाही. सुनील शेट्टी म्हणाले, "तिने मला सांगितले, 'बाबा, मला यापुढे सिनेमात काम करायचं नाही.' असं ती म्हणाली आणि निघून गेली. मी तिच्या या निर्णयाचा आदर करतो. तिने इतरांंचं न ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकलं ही चांगली गोष्ट आहे." अशाप्रकारे सुनील यांनी अथियाच्या निर्णयाबद्दल खुलासा केला.
अथियाची कारकीर्द
अथिया शेट्टीने जानेवारी २०२३ मध्ये क्रिकेटपटू के. एल. राहुलशी विवाह केला. मार्च २०२५ मध्ये त्या दोघांना मुलगी झाली. त्यांनी मुलीचे नाव 'इवारा' ठेवले आहे. सुनील शेट्टी यांनी आपल्या मुलीच्या आईपणाच्या भूमिकेचे कौतुक करताना म्हटले, "आज ती तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भूमिकेत आहे – आईपणाची. ती या नव्या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेत आहे." अथियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. परंतु तिच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक करुन सपोर्ट केला आहे.
अथियाने २०१५ मध्ये 'हीरो' या चित्रपटातून पदार्पण केले होते आणि त्यानंतर 'मुबारकां' (२०१७) आणि 'मोतीचूर चकनाचूर' (२०१९) या दोन चित्रपटांमध्ये तिने काम केले. तथापि, या चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही अधियाच्या अभिनयाचं लोकांनी कौतुक केलं.