अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) १९९० साली आलेल्या 'आशिकी' सिनेमातून रातोरात स्टार झाली. तिच्याकडे सिनेमा, ब्रँड्सच्या ऑफर्स आल्या. मात्र एका अपघातामुळे तिचं खूप नुकसान झालं. तिची स्मरणशक्ती गेली. नंतर ती संन्यासी झाली. आता काही दिवसांपासून ती पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान 'आशिकी' सिनेमाचं पूर्ण मानधन आजपर्यंत मिळालं नसल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवाल म्हणाली, "त्या काळी इंडस्ट्रीत दाऊद इब्राहिमसारख्या लोकांचं राज्य असायचं. इंडस्ट्रीत येणारा सगळा पैसा अंडरवर्ल्डमधून यायचा. मला आजपर्यंत आशिकीचे सगळे पैसे मिळालेले नाहीत. मानधनाच्या फक्त ६० टक्के मला मिळालं. बाकी ४० टक्के अजूनही त्यांनी मला देणं आहे. पण ठीक आहे. आशिकी नंतर मी खूप कमावलं. मॉडेलिंगमध्ये तर मी यापेक्षा जास्त कमावलं. मी अनेक ब्रँड्सची ब्रँड अँबेसिडर बनले. त्यावेळी कोणी अभिनेताही ब्रँड अँबेसिडर नसायचा. सुनील गावस्कर सारखे लोकच अँबेसिडर व्हायचे. ठिके मला पूर्ण पैसे नाही मिळाले, मीच त्यांना ते गिफ्ट दिलं समजा."
फिल्म इंडस्ट्रीबद्दल ती पुढे म्हणाली, "हा फारच वाईट धंदा होता. आज मी त्याचा भाग नाही. जर मी आज पुन्हा इंडस्ट्रीत आले तरी मला कल्पना आहे की ही इंडस्ट्रीशी आधीपेक्षाही जास्त वाईट झाली असणार. त्या काळी सगळं टेबलाखाली व्हायचं. दाऊदसारखे लोक असायचे. तो पूर्ण वेगळाच सीन होता."
सध्या काय करते अनु अग्रवाल?
अनु अग्रवाल आता सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. १९९९ साली तिचा अपघात झाला होता ज्यात तिची स्मरणशक्ती गेली. नंतर ती अध्यात्माच्या मार्गाला वळली. झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन ती योगचे धडे देते.