Join us

'बॉलिवूडमध्ये नुसता पैसा खर्च केला जातो, साऊथमध्ये प्रत्येक पैसा...'; इमरान हाश्मीने केली इंडस्ट्रीची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 1:34 PM

Emraan hashmi: इमरान लवकरच साऊथ सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात काम करताना कोणता फरक जाणवतो हे त्याने सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan hashmi) लवकरच ओजी या तेलुगू सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो साऊथ स्टार पवन कल्याण याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे सध्या तो सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने या सिनेमानिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेमांमधील फरकावर भाष्य केलं आहे.

ओजी या सिनेमात इमरान नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी त्याने सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे. इमरानने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साऊथ इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं जातं हे सांगितलं आहे. तर, बॉलिवूडमध्ये नुसताच पैसा खर्च केला जातो असंही त्याने म्हटलं आहे.

"साऊथ इंडस्ट्रीमधील निर्माता आपल्यापेक्षा (बॉलिवूड) जास्त शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात. ते सिनेमासाठी खर्च करणारा प्रत्येक पैसा स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतात. या सिनेमाचं कथानक दमदार असून त्याची स्क्रिप्टही प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आहे," असं इमरान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "हिंदी सिनेमांमध्ये चुकीच्या विभागांवर पैसा खर्च केला जातो. तर साऊथ सिनेमांमध्ये व्हिज्युअल अत्यंत सुंदररित्या केले जातात. त्यामुळे बॉलिवूड सिनेमाला साऊथच्या निर्मात्यांकडून आणि सिनेमाकडून बरंच काही शिकण्याची गरज आहे."

दरम्यान, सध्या अनेक बॉलिवूड स्टार साऊथ सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहेत. इमरान व्यतिरिक्त सैफ अली खान, जान्हवी कपूर हे कलाकार सुद्धा दाक्षिणात्य सिनेमात काम करण्यास सज्ज आहे. सैफ आणि जान्हवी लवकरच ज्युनिअर एनटीआर यांच्या 'देवरा पार्ट 1' या सिनेमात झळकणार आहेत.

टॅग्स :बॉलिवूडइमरान हाश्मीTollywoodसेलिब्रिटीसिनेमा