माहिरा खानच्या मते ‘या गोष्टी रईसमध्ये करता आल्या नाहीत’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 19:38 IST
रईस चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला काही गोष्ट न करता आल्याची खंत आहे. इन्स्टाग्रामवर तिने छायाचित्र टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माहिरा खानच्या मते ‘या गोष्टी रईसमध्ये करता आल्या नाहीत’!
रईस चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला काही गोष्ट न करता आल्याची खंत आहे. इन्स्टाग्रामवर तिने छायाचित्र टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.माहिरा खानने ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती शाहरूख खानची पत्नी आहे. दोन दिवसांपूर्वी तिने एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे’ या चित्रपटातील काजोलच्या स्टाईलप्रमाणे तिने मोहरीच्या शेतात गिरकी घेतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘या गोष्टी आम्ही रईसमध्ये करू शकलो नाही’ अशी फोटोओळ तिने दिली आहे. माहिरा खानच्या रईस चित्रपटातील भूमिकेबाबत बरेच वादळ उठले होते. पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. भारतीय चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांना स्थान असू नये, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली होती. त्यामुळे रईस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये माहिरा खानला स्थान देण्यात आलेले नव्हते.माहिरा खानने बॉलिवूडविषयी आपले मत व्यक्त केले होते, त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. रईसला पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होऊ शकला नव्हता.