Join us
Daily Top 2Weekly Top 5

​फॉरेन्सिक अहवालानुसार या कारणामुळे झाले श्रीदेवी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:10 IST

श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोस्टमार्टमचा निकाल नुकताच आला असून या निकालानुसार त्यांचा मृत्यू हा ...

श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोस्टमार्टमचा निकाल नुकताच आला असून या निकालानुसार त्यांचा मृत्यू हा हृदयविकारामुळेच झाला आहे. गल्फमधील एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, गल्फ देशात एखाद्या व्यक्तीचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले आणि निधनाचे कारण माहीत असेल तर पार्थिव लगेचच कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येते. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटल सोडून दुसरीकडे कुठेही झाला तर त्याच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी केली जाते. व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला असला तरी पोलिसांना कळवावे लागते. त्यानंतर ते केस दाखल करतात आणि त्याची चौकशी करतात आणि त्यातही पार्थिव देशाच्या बाहेर पाठवायचे असेल तर अधिक औपचारिकता पार पाडाव्या लागतात. त्यामुळेच श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यास वेळ लागत आहे.
श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या अल क्वासिस येथील शवगृहात ठेवण्यात आले आहे. आता फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर त्यांचे मृत्युपत्र बनवण्यात येईल. त्यानंतर पोलिस श्रीदेवी यांचे पासपोर्ट तपासतील आणि दुबई येथील भारतीय दूतावास त्यांचे पासपोर्ट रद्द करतील. त्यानंतर नो ऑब्सेक्शन सर्टिफिकेट आणि मृत्यूपत्र दिले जाईल. ही सर्टिफिकेट्स अरबी भाषेमध्ये असात. त्याचे इंग्रजी भाषांतर करण्यात येईल आणि ते सर्टिफिकेट श्रीदेवीच्या कुटुंबियांना देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.

Also Read : ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा