Join us

असे दिसले आमिर खानचे कुस्तीप्रेम....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:47 IST

आमिर खान एखादा चित्रपट साकारताना किती परिश्रम घेतो. यासाठी त्याची किती तयारी असते, हे कोल्हापुरात दिसून आले. ‘लोकमतची दंगल’ ...

आमिर खान एखादा चित्रपट साकारताना किती परिश्रम घेतो. यासाठी त्याची किती तयारी असते, हे कोल्हापुरात दिसून आले. ‘लोकमतची दंगल’ या कार्यक्रमानिमित्ताने आमिर खान कोल्हापुरात आला होता. आमिर कोल्हापुरात आला असताना, त्याच्या हस्ते कुस्ती लावण्यात येणार आहे, हे त्याला माहिती नव्हते. आमिरला कुस्ती लावण्याची विनंती करण्यात आली. आमिरनेही ही विनंती अत्यंत आनंदाने मान्य केली. स्टेजवरुन खाली उतरताना त्याने आपल्या पायातील चप्पल काढली. आखाड्यात चप्पल घेऊन जाता येत नाही, हे आमिरला माहिती होते. चप्पल काढून तो आखाड्यात उतरला.दंगल चित्रपट करताना त्याने खूप संशोधन केले आहे. आमिरचे खेळाप्रति असणारे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. कुस्ती लावण्यात आल्यानंतर आमिरने ही कुस्ती पाहिली. इतकेच नव्हे तर त्याच्या हस्ते लावण्यात आलेल्या कुस्तीतील विजेत्या आणि उपविजेत्या मुलींचे खूप कौतुक केले. या दोन्ही मुलींना स्टेजवर बोलावून त्यांना बक्षीसेही दिली.आमिरचा दंगल चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असून, या चित्रपटात त्याने महावीरसिंग फोगट ही भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याने वस्तादाची भूमिका केली आहे. कोल्हापूर ही कुस्तीची नगरी असल्याने साहजिकच आमिरविषयी कुस्तीप्रेमी कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आमिरने आखाड्यात येऊन कुस्ती लावली आणि पैलवानांचे कौतुक केल्याने कोल्हापूरकर जाम खुश झाले. कुस्ती हा प्राचीन आणि आव्हानात्मक खेळ असल्याने यामुळे शारीरिक कसरत होते. दंगल चित्रपट करण्यामागचा आपला हाच हेतू होता. दंगल चित्रपटानंतर कुस्तीला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षाही आमिर खानने व्यक्त केली.