आमिर खानला ‘महाभारत’वर बनवायचा चित्रपट; साकारायची कर्णाची भूमिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 23:37 IST
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान गेल्या काहीकाळापासून ‘महाभारत’वर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. ‘महाभारत’विषयी आमिर करीत असलेल्या ...
आमिर खानला ‘महाभारत’वर बनवायचा चित्रपट; साकारायची कर्णाची भूमिका!!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान गेल्या काहीकाळापासून ‘महाभारत’वर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. ‘महाभारत’विषयी आमिर करीत असलेल्या चर्चेवरून असे लक्षात येते की, तो पूर्ण तयारीनीशी याबाबतचा विचार करीत आहे. एका चर्चेदरम्यान आमिरने म्हटले की, मी गेल्या काही वर्षांपासून ‘महाभारत’वर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करीत असून, बंगाली व्हर्जनमध्ये आलेल्या ‘महाभारत’वरून मी खूपच प्रभावीत असल्याचे त्याने सांगितले. पुढे बोलताना आमिरने म्हटले की, माझ्यासाठी महाभारत खूप मोठा प्रोजेक्ट असेल. कारण एकदा मी या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली की, पुढचे १५ वर्षे केव्हा संपतील हे सांगणे अवघड आहे. कारण या चित्रपटासाठी सुरुवातीचे पाच वर्षे तर रिसर्च आणि कथा लिहण्यास जातील. या चित्रपटाची शूटिंग आणि बजेटही मोठे असेल. जेव्हा महाभारत बनेल तेव्हा हॉलिवूडचा ‘लॉर्ड आॅफ द रिंग’ हा चित्रपटदेखील त्याच्यासमोर कमी भासेल. जगातील सर्वांत मोठ्या बजेटचा हा चित्रपट असेल. आमिर ‘महाभारत’ या चित्रपटात कर्णाची भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो की, महाभारतात मला कर्णाची पहिली एंट्री खूपच प्रभावित करते. जेव्हा तो पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतो अन् कुंती त्याचे कवच-कुंडल बघून ती बेशुद्ध पडते तो प्रसंग अंगावर रोमांच करणारा आहे. मी कर्णाविषयी हाच प्रसंग कायम मनात ठेवतो अन् त्यावर विचार करीत असतो, असेही आमिर सांगतो. महाभारतची निर्मिती करण्यासाठी आमिरने पूर्ण प्लॅनिंग केले आहे. त्याला हा चित्रपट सात भागांमध्ये बनवायचा आहे. याबाबत आमिर म्हणतोय की, ज्या पद्धतीने मी विचार करीत आहे, त्यावरून या चित्रपटाची सात भागांमध्ये निर्मिती होऊ शकते. कारण पहिल्या भागात केवळ भीष्म पितामह यांचीच कथा पूर्ण होईल. पहिल्या भागाचे भीष्म पितामहच हिरो असतील. कारण जोपर्यंत तुम्ही भीष्म पितामह यांना समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला महाभारत समजणार नाही. पहिल्या भागाच्या अखेरीस कौरव आणि पांडव यांचा जन्म होईल. त्यानंतर त्यांचे बालपण दाखविले जाईल. यावेळी आमिरने दिग्दर्शक, वेळ आणि पोस्ट प्रॉडक्शनविषयीही आपले मत मांडले. तो म्हणाला की, जर मी प्रॅक्टिकली महाभारत बनविण्याचा विचार केला तर सात भागांसाठी सात दिग्दर्शकांची मी निवड करणार. जर तुम्ही सात भागांवर काम करणार तर तुम्हाला कमीत कमी २१ ते २२ वर्ष इतका कालावधी लागेल. या २२ वर्षांच्या काळात अभिनेत्यांचे चेहरे बदलून जातील. त्यामुळे चित्रपटाचे एकत्र शूटिंग करावे लागेल. तसेच एखादा असा व्यक्ती असेल जो, क्रिएटिव्ह हेड म्हणून दिग्दर्शकांना गाइड करणार. जेव्हा हे सात दिग्दर्शक वेगवेगळ्या यूनिटमध्ये शूटिंगला सुरुवात करतील तेव्हा एक-दोन वर्षांत शूटिंग पूर्ण होईल. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनने हळूहळू काम पूर्ण केल्यास सहा-सहा महिन्यांत एक-एक भाग रिलीज करता येईल. महाभारतच्या बजेटविषयी बोलताना आमिर म्हणतो की, महाभारत असा विषय आहे जो एका क्लियर व्हिजनने बनवावा लागेल. त्यामुळे यासारखा एपिक चित्रपट बनविताना बजेटचा विचार केला जाऊ नये. मला असे वाटते की, महाभारतला आपण एका गिफ्टप्रमाणे बनवायला हवे. बजेटविषयी बोलायचे झाल्यास एका भागासाठी दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचे बजेट असेल. पुढे बोलताना आमिर म्हणतोय की, भारतात जर ‘महाभारत’ या विषयावर चित्रपटाची निर्मिती करायची झाल्यास पैशांची कमी भासणार नाही. कारण हा असा विषय आहे, जो प्रत्येक माणूस थिएटरमध्ये जाऊन बघण्याची इच्छा ठेवेल. आपल्या देशाची लोकसंख्या पाचशे मिलियन असून, यातील ५० कोटी लोकांनी जरी हा चित्रपट बघितला तरी शंभर रुपये तिकिटाप्रमाणे पाच हजार कोटी रुपयांची कमाई होईल. मला नाही वाटतं की, आपल्या देशातील कोणीही हा चित्रपट बघण्यासाठी फोन किंवा टीव्हीवर येण्याची प्रतीक्षा करेल. महाभारतच्या कास्टिंगविषयी आमिर म्हणतोय की, चित्रपट थ्रीडीमध्ये बनवायला हवा. या चित्रपटामध्ये काम करणाºया कलाकारांची निवड देशभरातून करायला हवी. त्यातही साउथच्या कलाकारांना प्राधान्य द्यायला हवे. आमिर महाभारतविषयी सांगत असलेल्या या सर्व प्लॅनिंगवरून एक गोष्ट तर निश्चित आहे की, तो हा चित्रपट बनविण्याबाबत किती गंभीर आहे. त्याने प्लॅन केलेल्या सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर तो महाभारत पडद्यावर रंगविण्याचा विचार करू शकतो असेच एकंदरीत दिसत आहे.