Join us
Daily Top 2Weekly Top 5

'होय, माझी चूक झाली'; आमिर खानचा वैवाहिक आयुष्य आणि मुलांना वेळ न दिल्याबाबत मोठा कबुलीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 23:19 IST

आमिर खानला बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखलं जातं, पण आज त्यानं स्वतः आपण परफेक्शनिस्ट नसल्याचा खुलासा केला आहे. कारण त्याला स्वत:च्या कुटुंबाला समजून घेता आलं नाही आणि वेळही देता आला नाही.

आमिर खानलाबॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखलं जातं, पण आज त्यानं स्वतः आपण परफेक्शनिस्ट नसल्याचा खुलासा केला आहे. कारण त्याला स्वत:च्या कुटुंबाला समजून घेता आलं नाही आणि वेळही देता आला नाही. आमीरनं त्याच्या वाढदिवशी त्याचं आयुष्य, त्याचा अयशस्वी ठरलेला विवाह आणि कुटुंबाविषयी काही खुलासे केले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमीरनं त्याच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष दिलं नाही याची कबुली दिली आहे. 

करिअरला सुरुवात केली तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केलं. करिअरचा पाया रचण्यासाठी लोक आदर्शपणे तीन ते चार वर्षे देतात, अगदी पाच वर्षे देतात, याकडे लक्ष वेधलं असता, आपल्या करिअरला कुटुंबाच्या तुलनेत अधिक वेळ दिला, असं आमिरनं म्हटलं आहे. आमिरचं दोन वेळा लग्न झालं आहे. पहिलं रीना दत्ताशी तो विवाह बंधनात अडकला होता. त्यांना जुनैद आणि इरा खान ही दोन मुलं आहेत. २००२ मध्ये विभक्त होण्यापूर्वी त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली होती. त्यानंतर आमीरनं किरण राव यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना आझाद खान नावाचा मुलगा झाला. १५ वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी त्याने किरण रावपासून वेगळं झाल्याची घोषणा केली होती.

"कुठेतरी मी माझी जबाबदारी पार पाडली नाही. मी माझे आई-वडील, माझी भावंडं, माझी पहिली पत्नी- रीना जी, किरण जी, रीनाचे आई-वडील, किरणचे आई-वडील, माझी मुलं, हे सर्व माझ्या जवळचे आहेत. मी 18 वर्षांचा होतो, जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा मी स्वत:ला झोकून दिलं होतं. मला खूप काही शिकायचं होतं, मला इतकं करायचं होतं की कुठेतरी, आज मला जाणवलं की जे लोक माझ्या जवळचे होते, त्यांना मी हवा तितका वेळ देऊ शकलो नाही. जे माझ्यासाठी महत्वाचे आहेत.", असं आमिर खान म्हणाला. 

"मी माझ्या प्रेक्षकांशी एक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि यासाठी मी माझं खूप काही पणाला लावलं. मी माझ्या प्रेक्षकांसोबत हसलो, त्यांच्यासोबत रडलो, त्यांचा हात धरला. त्याचवेळी त्यांनी मला प्रोत्साहनही दिलं. 'तारे जमीन पर' सारख्या माझ्या चित्रपटातून मी त्याला आशा दिली. मी माझा सगळा वेळ माझ्या कामाला दिला आहे आणि ते नातं मी खूप घट्ट केलं आहे. तरीही माझं कुटुंब माझ्यासोबत आहे असं मला वाटलं. मला त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकायची होती आणि मी पूर्णपणे विसरलो की माझं कुटुंब माझी वाट पाहत आहे", असंही आमिरनं म्हटलं. 

कुटुंबासोबत वेळ घालवता येत नसल्याची आमिरला खंतकुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही याचा पश्चाताप नक्कीच आता होत असल्याचंही आमिरनं म्हटलं आहे. "मुलांसोबत पुरेसा वेळ घालवू शकलो नाही ही माझी सर्वात मोठी चूक आहे. पण यासाठी मी माझ्या व्यवसायाला दोष देणार नाही. आज इरा 23 वर्षांची आहे पण जेव्हा ती 4-5 वर्षांची होती तेव्हा मी तिच्यासाठी तिथे नव्हतो. मी चित्रपटांमध्ये व्यग्र होतो. प्रत्येक मुलाला पालकांची गरज असते कारण तुम्ही लहान असताना तुमच्या स्वतःच्या भीती आणि अपेक्षा असतात. पण जेव्हा तिला माझी सर्वात जास्त गरज होती, जेव्हा ती घाबरेल तेव्हा मी तिचा हात धरायला नव्हतो आणि मला माहित आहे की तो क्षण कधीच परत येणार नाही.", असं आमिर म्हणाला. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूड