71st national film awards : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण समारंभ आज पार पाडला. कलाकारचं प्रोत्साहन वाढविण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली होती. यंदाच्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा १ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली होती. यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर राणी मुखर्जीने नाव कोरलं आहे. आज २३ सप्टेंबर २०२५ रोजी हा पुरस्कार दिल्लीतील विज्ञान भवन येथे तिला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर्षी राणी मुखर्जीला तिच्या अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राणी मुखर्जीला आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. अभिनेत्रीला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मेस्सी आणि शाहरुख खानला विभागून देण्यात आला आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या चित्रपटात राणी मुखर्जीने देबिका चॅटर्जी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या पुरस्कार विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.