दीपिका पादुकोणच्या मागणीनंतर ‘पद्मावती’ची रांगोळी नष्ट करणा-या १३ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 12:25 IST
‘पद्मावती’च्या निमित्ताने निर्माण झालेले वाद सध्या तरी थांबायचे नाव घेत नाहीयं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरत येथील एका शॉपिंग मॉलमध्ये ...
दीपिका पादुकोणच्या मागणीनंतर ‘पद्मावती’ची रांगोळी नष्ट करणा-या १३ जणांना अटक
‘पद्मावती’च्या निमित्ताने निर्माण झालेले वाद सध्या तरी थांबायचे नाव घेत नाहीयं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरत येथील एका शॉपिंग मॉलमध्ये ‘पद्मावती’च्या पोस्टरची शानदार रांगोळी साकारण्यात आली होती. पण एका हिंदूत्ववादी संघटनेच्या मूठभर लोकांनी काही क्षणात या रांगोळीची नासधूस करत, ती नष्ट केली होती. या घटनेमुळे ‘पद्मावती’त राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण कमालीची संतापली होती. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांना टॅग करत, सोशल मीडियावर या घटनेविरोधातील नाराजी तिने बोलून दाखवली होती. ‘हे असले प्रकार कुठेतरी थांबायला हवेत आणि कायदा हातात घेणा-यांविरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी तिने केली होती. दीपिकाच्या या मागणीची गंभीर दखल घेत, पोलिसांनी गुरुवारी ही रांगोळी नष्ट करणा-या हिंदू युवा वाहिनीच्या १३ सदस्यांना अटक केली. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान संघटनेचे अध्यक्ष नरेन्द्र चौधरी यांनी ‘पद्मावती’ला विरोध करत, सूरतेत हा चित्रपट रिलीज झाल्यास आम्ही रस्त्यांवर उतरू, अशा इशारा दिला आहे. सूरतेच्या मॉलमध्ये करण जरीवाल नामक कलाकाराने ‘पद्मावती’च्या पोस्टरची रांगोळी साकारली होती. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल ४८ तास लागले होते. कलाकाराने ४८ तास एका जागेवर बसून ही रांगोळी काढली होती. पण हिंदू युवा वाहिनीच्या सदस्यांनी काही सेकंदात या कलाराकाराची ४८ तासांची मेहनत पाण्यात घालवली.ALSO READ: आणि दीपिका पादुकोणचा रागाचा पारा चढलाकालपरवाच जय राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली होती. रिलीज आधी ‘पद्मावती’ आम्हाला दाखवला गेला नाही आणि आमच्या संमतीविना तो रिलीज झालाच आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळलेच तर चित्रपटगृहे पेटवून देऊ, असे जय राजपुताना संघाने म्हटले होते.त्याआधीशूटींगच्या अगदी पहिल्या टप्प्यात करणी सेनेने ‘पद्मावती’च्या सेटवर धिंगाणा घातला होता. ‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत गत जानेवारीच्या अखेरिस करणी सेनेने राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला केला होता. यादरम्यान ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाणही करण्यात आली होती. यानंतर ‘पद्मावती’चा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला होता. पण काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटचीही तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता.