Join us

1 RK मध्ये राहणारा सलमान खान कोट्यवधी रुपयाच्या कमाईचे करतो तरी काय ?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:19 IST

कलाकार सिनेमा, मालिका, नाटक या माध्यमातून आपल्या कला सादर करतात आणि रसिकांचं मनोरंजन करतात. सिनेमा, मालिका, रियालिटी शोसाठी कलाकारांना ...

कलाकार सिनेमा, मालिका, नाटक या माध्यमातून आपल्या कला सादर करतात आणि रसिकांचं मनोरंजन करतात. सिनेमा, मालिका, रियालिटी शोसाठी कलाकारांना गलेलठ्ठ मानधनही मिळतं. दिवसेंदिवस कलाकारांच्या मानधनात वाढ होतच चालली आहे. सिनेमा असो किंवा छोटा पडदा कलाकारांना मोठं मानधन मिळत असल्याचे पाहायला मिळतं. त्यातच गेल्या काही वर्षात छोटा पडदाही छोटा राहिला नसल्याचं सिद्ध झालं आहे. छोट्या पडद्यावरील रियालिटी शोमुळे सेलिब्रिटींची डिमांड चांगलीच वाढली आहे. दिग्गज कलाकारांना आपल्या शोमध्ये घेण्यासाठी विविध वाहिन्यांमध्ये तीव्र स्पर्धाही पाहायला मिळते. रेटिंगच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रसिकांचा आवडता सेलिब्रिटी खेचण्यासाठी चढाओढ रंगते. त्या कलाकाराला आपल्या शोममध्ये आणण्यासाठी संबंधित वाहिनी किंवा निर्माते कितीही किंमत मोजायला तयार असतात. अशाच एका बिग बजेट रिअॅलिटी शोचा होस्ट म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या दहा वर्षांपासून सलमान खान बिग बॉस या रियालिटी शोचा होस्ट म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतो आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये मानधन सलमानला देण्यात येत असल्याच्या चर्चा रंगतात. यंदा अकराव्या सीझनमध्ये मानधनाच्या मुद्यावरुन सलमान खान या शोमध्ये सहभागी होणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र 11 कोटी रुपये मानधन देऊन सलमानला बिग बॉसमध्ये होस्ट म्हणून कायम ठेवण्यात निर्माते यशस्वी ठरले आहेत. मात्र बड्या बॅनर्सचे सिनेमा आणि बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणारा सलमान करतो तरी काय असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. वन रुम किचन रुममध्ये राहणा-या सलमानचा दिवसाचा खर्च काय असेल आणि इतक्या कोट्यवधी रुपयांचं काय करतो असा प्रश्नही मनात येणं स्वाभाविकच आहे. याचाच खुलासा सलमान खाननं बिग बॉसच्या अकराव्या सीझनच्या लॉन्चिंगवेळी केला. आपल्या कमाईतून मिळणारे कोट्यवधी रुपये सलमान समाजसेवेसाठी करतो. दबंग सलमान खानची BEING HUMAN ही सामाजिक संस्था हे सर्वश्रुत आहे. BEING HUMANच्या माध्यमातून सलमान गरजू आणि गरीबांना मदत करतो हेही आता सा-यांना माहिती आहे. ही संस्था चालवण्यासाठी आणि गरजू तसंच गरीबांना मदत करण्यासाठी लागणारा पैसा सलमान खान त्याच्या कमाईच्या माध्यमातूनच उभारतो. आपल्या कमाईचा सगळा पैसा तो या संस्थेसाठी आणि पर्यायाने सामाजिक कार्यासाठी देतो. भाईजान सलमान खानचं या दातृत्वाबाबत वाचून कुणालाही त्याचं कौतुक करावंसं वाटेल.