Join us

"त्या एअर होस्टेसने ड्रिंकचा ट्रे माझ्या अंगावर सांडला आणि...", एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये अभिनेत्रीला आला असा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:23 IST

एअर इंडियाच्या विमानाचा हा अपघात झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे विमान प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिनेदेखील तिचा एअर इंडिया विमान प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ हे विमान उड्डाण घेताच काही क्षणातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. अहमदाबादवरुन हे विमान लंडनला जात होतं. या विमानात २४२ प्रवासी होते. या भीषण अपघाताने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या विमानाचा हा अपघात झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे विमान प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिनेदेखील तिचा एअर इंडिया विमान प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. "मार्च २०२५ मध्ये मी बहरीनवरुन परतत असताना एअर हॉस्टेसने चुकून ड्रिंक्सचा संपूर्ण ट्रे माझ्यावर सांडला. मी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण भिजले होते. विमानात दुसरी सीटही रिकामी नव्हती. त्या क्षणी मी अस्वस्थ झाले आणि मला राग आला होता. पण, तेव्हा मला माझ्या आईचे शब्द आठवले. ती म्हणाली होती की नेहमी लक्षात ठेव की अनावधानाने झालेली चूक ही चूक नसते. तू ज्या क्लासमधून प्रवास करत आहेत त्याला तुझ्या हृदयाची जागा घेऊ देऊ नको. मी शांत झाले. त्यानंतर त्या एअरहोस्टेसने संपूर्ण प्रवासात फ्लाइट विआनाला येईपर्यंत मला कंम्फर्टेबल करण्यासाठी प्रयत्न केले. ती मला १० हजार वेळा तरी सॉरी बोलली असेल. तिने दाखवलेल्या दयाळूपणा आणि काळजी याची मी आभारी आहे", असं तिने म्हटलं आहे. 

"जेव्हा विमानाचा अपघात होतो, तेव्हा बिसनेस, इकॉनॉमी, फर्स्ट या कशातच फरक राहत नाही. त्या आकाशात आपण सगळे समान असतो, आणि सगळे प्रार्थना करत असतो. एअर इंडिया विमान अपघातानांतर मला धक्का बसला आहे. ज्यांनी प्राण गमावले, ज्यांनी आपले नातेवाईक गमावले आणि ३५ हजार फूटांवरही रोज उत्तम सेवा देणाऱ्या त्या क्रू मेंबर्ससाठी माझं हृदय तुटतंय. मला आठवतंय की मी माझ्या जुळ्या बाळांसोबत सिंगापूर ते मुंबई असा एकटीने प्रवास करत होते. एअर इंडिया क्रूने तेव्हा मला खूप मदत केली. किंवा मी १९ वर्षांची असताना जॅमिकाहून न्यूयॉर्केद्वारा मी मुंबईला येत असताना ज्याच्यावर मी प्रेम करते अशा व्यक्तीने मला दुखावलं तेव्हा मी रडत होते. तेव्हा एअर इंडियाच्या फ्लाइट अटेंडन्टने माझा हात हातात घेऊन मला धीर दिला होता, हे मी कधीही विसरू शकत नाही", असं तिने म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "संपूर्ण जगातील क्रू मेंबर्सला मी सांगू इच्छिते की तुम्ही फक्त ट्रे किंवा बोर्डिंग पासेस होल्ड करत नाही तर तुम्ही अश्रू, मानवी भावना, सुरक्षितता प्रवाशांच्या या सगळ्या गोष्टींसाठीही जागा ठेवता. विमान अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो". 

टॅग्स :एअर इंडियासेलिब्रिटी