सोन्याच्या तस्करीचे हायप्रोफाईल प्रकरण उघड झाले आहे. डीआरआयने मोठी कारवाई करत बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला अटक केली आहे. तिच्या ताब्यातून तब्बल १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आता या रान्याचे एकेक कारनामे समोर येत आहेत.
रान्या ही सतत आंतरराष्ट्रीय दौरे करत होती. यामुळे डीआरआयने तिच्यावर लक्ष ठेवले होते. ३ मार्चला ती जेव्हा दुबईहून इमिरेटसच्या विमानाने बंळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर उतरली तेव्हा तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. तिची झडती घेण्यात आली तेव्हा तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याचे दिसून आले.
रान्या रावने अधिकतर सोने तिच्या शरीरावर परिधान केले होते. तसेच तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बारही लपविण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे रान्या ही आयपीएस रामचंद्र राव यांची मुलगी आहे, ते सध्या कर्नाटक पोलिसांच्या डीजीपी हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. यामुळे रान्याला अन्य कोणत्या सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती का याचीही तपासणी केली जात आहे.
रान्याला अटक केल्यानंतर मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या हाय प्रोफाईल तस्करीमुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांसह कर्नाटक पोलीसही हैराण झाले आहेत.
विमानतळावर घ्यायची व्हीआयपी ट्रिटमेंट...रान्या राव ही विमानतळावर आली की स्वत:ला डीजीपींची मुलगी असल्याचे सांगायची आणि घरी सोडण्यासाठी स्थानिक पोलिसांना सांगायची. आता हे पोलीस कर्मचारी देखील रडारवर आले आहेत. रान्या गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती. ती दुबईहून बेंगळुरूला मोठ्या प्रमाणात सोने घेऊन येत टीप मिळाली होती. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे.