Join us  

"एल्विशला अटक करा", मनेका गांधींच्या मागणीवर युट्यूबरचं उत्तर, म्हणाला, "लोकसभेचं तिकीट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 3:40 PM

भाजपा खासदार मनेका गांधी यांनी एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली होती. त्याला आता युट्यूबरने उत्तर दिलं आहे. 

'बिग बॉस ओटीटी' विनर आणि युट्यूबर एल्विश यादवविरोधात नोएडा पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रेव्ह पार्टी आणि क्लबमध्ये सापांचे विष पुरवण्याच्या प्रकरणात एल्विशचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी नोएडात केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केल्यानंतर एल्विशसह अन्य सहा जणांवर एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी भाजपा खासदार मनेका गांधी यांनी एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली होती. त्याला आता युट्यूबरने उत्तर दिलं आहे. 

"एल्विश निर्दोष असेल, तर तो फरार का झालाय? त्याच्यावर आमची आधीपासून नजर होती. तो गळ्यात साप टाकून व्हिडिओ शूट करायचा आणि सापांची विक्रीही करायचा. हे दुर्मिळ साप बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी सात वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. हा माणूस टीआरपी वाढवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मनेका यांनी केली आहे," असं मनेका गांधी म्हणाल्या होत्या. याबाबत ट्वीट करत एल्विशने त्यांना उत्तर दिलं आहे. 

"Iskon वर आरोप करा, माझ्यावरही करा...लोकसभेचं तिकीट असं मिळतं का?" असं एल्विशने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याबरोबरच त्याने #shameonmanekagandhi हा हॅशटॅगही वापरला आहे. एल्विशने याबरोबरच मनेका गांधींचा व्हिडिओ शेअर केला आहे. "अशा व्यक्ती महत्त्वाच्या पदावर बसलेल्या आहेत हे पाहून आश्चर्य वाटतं. ज्या पद्धतीने मॅडमने आरोप केले आहेत. तशी माफीही तयार ठेवा," असं त्याने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

एका एनजीओजीच्या स्टिंग ऑपरेशननंतर नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ भागात छापेमारी केली होती. या छापेमारीत पाच कोब्रा आणि अन्य जातीचे मिळून एकूण नऊ साप आढळून आले. त्याचबरोबरच सापांचे विष पोलिसांना इथे सापडले. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून अन्य काही विरोधांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये युट्यूबर एल्विश यादवचाही समावेश आहे. 

 

टॅग्स :टिव्ही कलाकारमनेका गांधीबिग बॉस