Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाण (Suraj Chavan) हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. सध्या सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, यानिमित्ताने गुलिगत किंग सूरज जोरदार प्रमोशन करतो आहे. सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह अनेक सेलिब्रिटीमंडळी देखील पुढे आले आहेत. अशातच नुकताच सोशल मीडियावर सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील त्याचा सहस्पर्धक अभिजीत सावंतसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत-सूरज 'झापुक झुपूक' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिजीत सावंत त्याला 'झापुक झुपूक' सिनेमासाठी शुभेच्छा देखील देताना दिसतो आहे. सूरजला पाठिंबा देताना म्हणतो,"२० वर्षापूर्वी माझी पण अशीच सुरुवात झाली होती. भले मी मुंबईतील असलो तरी पण एका छोट्याशा जागेत राहिलो. एका मध्यमवर्गीय घरात वाढलो. माझ्या करिअरची सुरुवात देखील एका रिअॅलिटी शोमुळे झाली होती. मी नेहमी म्हणतो की, सूरजमध्ये मी स्वत: ला पाहतो आणि मी आतापर्यंत अशाप्रकारे पुढे आलो आहे. कारण ज्याप्रकारे एक साधा मुलगा आज इथपर्यंत पोहोचतो. अशीच त्याची प्रगती पुढे चालत राहो. त्याचसाठी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गाणं मी त्याच्यासाठी म्हणतो. त्यानंतर अभिजीतने म्हटलंय की, तुम्हा सर्व प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की, तुम्ही ज्याप्रकारे मला प्रेम दिलंत सूरजला देखील देत आला आहात. तेच प्रेम त्याच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाला द्या." असं आवाहन अभिजीतने चाहत्यांना केलं आहे.
'झापुक झुपूक' फेम सूरज चव्हाणने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलंय की, "माझा लाडका मोठा भाऊ आणि आपल्या भारताचा “टॉप चा गायक“ अभि दादा…! अभी दादा सोबत झापुक झुपूक गोलीगत नाचायला मला लईच जब्बर मज्जा आली…! कसला भारी नाचलाय अभि दादा @abhijeetsawant73 दादा आय लव यू….! २५ एप्रिल - झापुक झुपूक…! हाउसफुल्ल राडा करा….!" सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्याया व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.