'बिग बॉस' या रिॲलिटी शोमधून लोकप्रिय झालेला अभिनेता एजाज खान याने वर्सोवा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्याचा राजकीय प्रवास निराशाजनक होता. चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या एजाज खानचे इन्स्टाग्रामवर तब्बल ५.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण त्याला निवडणुकीत फक्त १५५ मतं मिळाली.
आता एजाज खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या लाजिरवाण्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. तसेच यामागे ईव्हीएम हे कारण सांगून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं आहे. "हा सर्व काही ईव्हीएमचा खेळ आहे. जे लोक वर्षानुवर्षे निवडणूक लढवत आहेत आणि राजकारणात आहेत, मोठ्या पक्षांचे मोठे उमेदवार पराभूत होत आहेत आणि फार कमी मतं मिळवत आहेत. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे जो लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढेही करत राहीन."
"ज्यांच्या पक्षाचं नाव होतं, त्यांचा स्वतःचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड होता आणि ज्यांनी १५ दिवसांत कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही त्यांचा पराभव झाला, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे भाऊ!" असं म्हटलं आहे. तसेच एजाज खानने अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. आपल्या हसण्यामागे पराभवाचं दु:ख लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्याचे चाहतेही त्याला साथ देत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
इन्स्टाग्राम व्यतिरिक्त एजाजने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट देखील केलं ज्यामध्ये त्याने लिहिलं की, "जय हो ३४०० कोटी... पैशांसमोर जनता हरली. महाराष्ट्र" हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लोक त्याचीच खिल्ली उडवत आहेत. काही लोक त्याच्या कुटुंबाने तरी त्याला मतदान केलं की नाही? असा प्रश्न विचारत आहेत आणि त्याला खूप ट्रोल केलं जात आहे.