Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आज मला भारतात भीती वाटते...", भूमी पेडणेकरचं महिला सुरक्षेबाबतीत धक्कादायक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:59 IST

भूमी पेडणेकरने नुकतंच एका चॅनलच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने महिला सुरक्षा, इंडस्ट्रीत होणारं महिलांचं शोषण यावर भाष्य केलं.

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. २०१५ साली'दम लगा के हैशा' सिनेमातून तिने पदार्पण केलं. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. भूमी नंतर वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर आली. 'बधाई दो','पती पत्नी और वो','टॉयलेट एक प्रेम कथा' सारख्या अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं. नुकतंच भूमीने भारतात महिला म्हणून भीती वाटते असं वक्तव्य केलं आहे. ती असं का म्हणाली वाचा.

भूमी पेडणेकरने नुकतीच एबीपी न्यूजच्या इंडिया समिट २०२५ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने बॉलिवूडमधील तिचं करिअर आणि तसंच इतर गोष्टींवर संवाद साधला. यावेळी तिला फिल्म इंडस्ट्रीत महिलांचं शोषण आणि कास्टिंग काऊचबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "हो इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच आहे. मला त्याचा अनुभव आलेला नाही पण मी जवळच्या व्यक्तींकडून ऐकलं आहे. मी करिअरची सुरुवातच कास्टिंग डायरेक्टर म्हणून केली होती. पण मी खूप सुरक्षित असा कास्टिंग इन्स्टिट्युशनमध्ये होते. एखाद्या मुलीची ऑडिशन होत असेल तर मी तिथे असायचेच. हेमा कमिटी रिपोर्टमधूनही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत त्यामुळे हा प्रकार नक्कीच आहे. 

तसंच आज आपल्या देशात एक स्त्री म्हणून मला भीती वाटते. फक्त या बॉलिवूड इंडस्ट्रीतच नाही तर आज सगळीकडेच महिला असुरक्षित आहेत. माझी चुलत बहीण जी कॉलेजमध्ये आहे आणि मुंबईत माझ्यासोबत राहते ती जर रात्री ११ वाजले तरी घरी आली नसेल तर मी अस्वस्थ होते. वर्तमानपत्रातही पहिल्या पानावर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या असतात. ही काही एखाद्या वेळी येणारी बातमी नाही तर जवळपास रोजच येणारी बातमी आहे. आपण हे सगळीकडेच अनुभवत आहोत. सोशल मीडियावरही पाहू शकता की कशाप्रकारच्या कमेंट्स येतात. माझ्या पोस्टवर काही कमेंट्स बघून धक्का बसतो. मी घातलेले कपडे तुम्हाला पटले नाही म्हणून तुम्ही अशा कमेंट्स करणार? ते पाहून वाईट वाटतं."

भूमी आगामी 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांचीही भूमिका आहे. याआधी ती 'भक्षक' या सिनेमातही झळकली.

टॅग्स :भूमी पेडणेकर महिलाकास्टिंग काऊचबॉलिवूड