Join us  

महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे 'हे' सर्वोत्कृष्ट चित्रपट नक्कीच पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 2:06 PM

बॉलिवूडमध्येही महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज  2 ऑक्टोबरला देशभरात जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या संघर्षामुळे ब्रिटीशांच्या जाचातून आपला देश मुक्त झाला. यांच्या लढ्यामुळे 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी दिलेला लढा आपण अनेक माध्यमांतून पाहतो, ऐकतो, वाचतो. बॉलिवूडमध्येही महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली.   गांधीजयंती निमित्त आज अशा काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया...

हे राम (२०००)डायरेक्टर कमल हासन यांनी भारत देशाची फाळणी आणि महात्मा गांधींजींची हत्या हे विषय 'हे राम' सिनेमामध्ये मांडले. महात्मा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. 2000 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला.

 गांधी (१९८२) सुप्रसिद्ध ब्रिटीश सिनेनिर्माते रिचर्ड एटनबरो यांनी बापूंच्या जीवनशैलीवर आधारित 'गांधी' सिनेमाची 1982 साली निर्मिती केली. सिनेमामध्ये ब्रिटीश अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटात गांधीजींचे जीवन अगदी जवळून दाखवण्यात आले होते. ज्याला ऑस्कर ऑवर्ड मिळाला होता.

द मेकिंग ऑफ महात्मा (१९९६) 

फिल्ममेकर श्याम बेनिवाल यांच्या या चित्रपटात अभिनेता रजत कपूरने गांधींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटात महात्मा गांधींच्या आयुष्यातील २१ वर्षे दाखवण्यात आली आहेत, जी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत घालवली होती. महात्त्मा गांधी जेव्हा अफ्रिकेमध्ये बॅरिस्टरची प्रॅक्टीस करत होते तेव्हाचा काळ दाखविला. 

गांधी माय फादर (२००७)हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हिरालाल गांधी यांच्या नात्यावर प्रकाश टाकणार आहे. दर्शन जरीवालाने या चित्रपटात गांधींची भूमिका केली होती तर अक्षय खन्ना हिरालाल गांधीच्या भूमिकेत दिसला होता. डायरेक्टर फिरोज अब्बास खान यांनी हा चित्रपट अतिशय शानदार बनवला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

मैंने गांधी को नहीं मारा (२००५) या चित्रपटात अनुपम खेर आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट एका निवृत्त हिंदी प्राध्यापकाभोवती फिरतो, ज्याला आपण महात्मा गांधींची हत्या केली आहे असे वाटते. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

लगे रहा मुन्नाभाई (२००६)

 राजू हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधींची भूमिका साकारली.  हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत अर्शद वारसीही दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि तो खूप गाजला. या चित्रापटातील संजय दत्तला अर्थात मुन्नाभाईला गांधीजी दिसत असल्याचा भास होत असतो. मुन्नाभाईची भूमिका अभिनेता संजय दत्त याने साकारली आहे. या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

टॅग्स :महात्मा गांधीबॉलिवूडसिनेमा