मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारीला झालेल्या हल्ल्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. जेव्हा सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरात एकूण ७ कर्मचारी होते. त्यातील ३ महिला आणि ४ पुरुष होते. हल्लेखोराने जेव्हा सैफवर चाकू हल्ला केव्हा तीन महिला कर्मचारी जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून पुरुष कर्मचारी घाबरले आणि घरात लपून राहिले. जर त्या चौघांनी हिंमत दाखवली असती तर हल्लेखोराला नियंत्रणात आणू शकले असते असं मुंबई पोलिसांच्या तपासात पुढे आले.
मुंबई पोलिसांनी ७२ तास चालवलेल्या शोध मोहिमेत हल्लेखोराला ठाण्यातून अटक करण्यात आली. ज्याचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे. हा बांगलादेशातील नागरिक असून तो अवैधरित्या मुंबईत राहतोय. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी शरीफुलला महिला कर्मचाऱ्याने बाहेरच्या खोलीत बंद केले. शरीफुल १६ तारखेला मध्यरात्री २ च्या सुमारास सैफच्या वांद्रे येथील घरात घुसला होता. तो घराच्या १० मजल्यापर्यंत पायऱ्या चढून तिथे पोहचला होता आणि नंतर डक्ट पाईप वापरून इलेक्ट्रॉनिक मजल्यावर चढला. तिथून सैफ आणि करीनाचा लहान मुलगा जहांगीरच्या बाथरूममध्ये घुसला. कारण बाथरूमच्या वेंटिलेशनसाठी ग्रिल लावली नव्हती.
दबक्या पावलांनी तो जहांगीरच्या खोलीत शिरला. सैफवरील हल्ल्यानंतर तिन्ही महिला कर्मचाऱ्याने शरीफुलला खोलीत बंद केले होते. मात्र तो पुन्हा बाथरूमच्या आत गेला आणि तिथून वेंटिलेशन एरियातून तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचा आणि त्यानंतर पायऱ्यांवरून खाली उतरला. सैफ अली खान वांद्रे येथील सतगुरू शरण बिल्डिंगमध्ये ११ व्या १२ व्या मजल्यावर डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. शरीफुलने इमारतीच्या मागील गेटमधून प्रवेश केला होता. बिल्डिंगच्या २ सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसत होता.
दरम्यान, सैफचा मुलगा जहांगीरला सांभाळणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांना जबाब दिला. त्यात हल्लेखोर जहांगीरच्या खोलीत दिसला होता. त्याला पाहून ती ओरडली तेव्हा सैफ आणि करीना धावत जहांगीरच्या खोलीपर्यंत पोहचले. सैफने हल्लेखोराच्या दिशेने पाऊल टाकताच त्याने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. तोपर्यंत इतर महिला कर्मचारीही पोहचल्या आणि सर्वांनी मिळून हल्लेखोराला खोलीत बंद केले. सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चाकू हल्ल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर तातडीने सैफला लिलावती रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.