Join us

'शेवंता'ने दिलं पण त्याच भूमिकेने हिरावूनही घेतलं, नक्की काय घडलं? अपूर्वा नेमळेकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:45 IST

अपूर्वा नेमळेकरने का सोडली होती 'रात्रीस खेळ चाले' मालिका?

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला (Apurva Nemlekar) 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता' या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिला अपूर्वा कमी तर शेवंता म्हणूनच लोक हाक मारायला लागले. एखाद्या कलाकारासाठी ही नक्कीच अभिनयाची पोचपावती असते. पण अपूर्वाला इतकं यश मिळूनही तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. याला कारणही ठरलं ते मालिकेच्या पडद्यामागच्या काही घडामोडी. नक्की काय झालं होतं?

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा म्हणाली, "आजही लोक मला शेवंता हाक मारतात हे ऐकायला खूप छान वाटतं. त्या भूमिकेने लोकांच्या मनात घर केलं. पण त्या भूमिकेचं रिजेक्शन ते मनाला सगळ्यात लागलं. आमचे मेकर्स, त्यावेळी चॅनलचे हेड, निर्मात्यांनी एका वादांकित मुद्द्यातून म्हटलं की तू शेवंता केलीस ते काही ग्रेट केलं नाहीस. दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीने केलं असतं तरी ते इतकंच छान केलं असतं. कारण मुळात आमच्या लिखाणात ती मजा होती. हे बोलणं कलाकाराला खूप लागतं. कारण तुम्ही जेव्हा जीव ओतून काम करत असता, झोपमोड करुन काम करता तेव्हा मेकर्स असं म्हणतात तेव्हा ते तुम्हाला खूप लागतं. मग असं वाटतं की ठिके आता मला बघायचंच आहे की कोणती अभिनेत्री ते इतक्या ताकदीने करु शकते. आता मी करणार नाही."

ती पुढे म्हणाली, "मी काही अशा अवाजवी मागण्याही केल्या नव्हत्या ज्यातून हे वाद व्हावेत. बेसिक पैशांची अपेक्षा ज्याच्यामुळे माझं घर चालणार नव्हतं आणि तुम्ही तेच देत नसाल त्यावर मी आवाज उठवला हे तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर सॉरी बॉस हा सगळा खेळ शेवटी पैशांचा आहे. शेवटी शेवंता म्हणून मला कोणी माझ्या घरचं रेशन भरणार नाही. लोकप्रियता घेऊन काय करु जर घर चालणार नसेल."

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार